Abhishek Ghosalkar Shoot Dead Sanajy Raut Post: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वैयक्तिक वादातून मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. असं असतानाच संबंधित घटना घडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊथ यांनी या प्रकरणातील आरोबी मॉरिसचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.


4 दिवसांपूर्वीच 'वर्षा' बंगल्यावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एका फोटो पोस्ट केला. हा फोटो 'वर्षा' बंगल्यावरील असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस समोरासमोर उभे राहून एकमेकांना नमस्कार करताना दिसत आहेत. हाच फोटो शेअर करत राऊत यांनी, "महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश नारोन्हा 4 दिवसांपूर्वीच 'वर्षा' बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मॉरिसला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले," असा दावा राऊत यांनी केला आहे. "वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय. आज त्याने (मॉरिसने) अभिषेकवर गोळ्या चालवून (त्याचा) बळी घेतला! फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी," असंही राऊत हा फोटो शेअर करत म्हणाले आहेत.



पोलीस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच


त्यापूर्वी राऊत यांनी अभिषेक घोसाळकरांवर उपचार सुरु होते तेव्हाही एक फोटो शेअर केला होता. "महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्यांना भेटतात. पक्षात प्रवेश देतात. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलीस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करत फिरत आहेत. फडणवीस राजीनामा द्या!" असं म्हणाले होते.


नक्की वाचा >> तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार



वाद मिटवल्याचा दावा अन् नंतर गोळीबार


काही दिवसांपूर्वीच कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच घोसाळकरांच्या हत्येची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात अनेक दिवसांपासून वाद होत अशी माहिती समोर आली आहे. या दोघांनी एकमेकांबरोबरचा वाद मिटवला होता. त्यामुळे मॉरिसने घोसाळकरांना साडी वाटप कार्यक्रमासाठी आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. बोरीवलीतील आयसी कॉलनीतील मॉरीसच्या ऑफिसमध्ये दोघांनी फेसबुक लाईव्हवरुन संवाद साधला. आम्ही वाद मिटवून एकत्र येत आहोत असं जाहीर केल्यानंतर हे फेसबुक लाइव्ह संपताना मॉरिसने घोसाळकरांवर 5 गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या घोसाळकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.