पिंपरी-चिंचवड : दापोडीमधील दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य ठेकेदार एम. बी. पाटील यांच्यासह दोन सुपरवायजर आणि उपकंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली असून एम. बी. पाटील अजूनही मोकाट आहेत. पालिकेकडून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुर्घटनेत मृत पावलेल्या विशाल जाधव या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना विम्याच्या आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार २० लाख मदत मिळेल, अशी माहिती देण्यात आलीय. मृत कामगाराला विम्याच्या माध्यमातून दोन लाख मदत मिळेल तसेच इतर ही मदत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे सत्ताधारी भाजपने स्पष्ट केले आहे.



पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये ढिगाऱ्याखाली अडकून नागेश कल्याणी जमादार आणि अग्निशमन दलाचा कर्मचारी विशाल हणमंतराव जाधव या दोघांना प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर महापालिकेच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. दापोडी इथे ड्रेनेजचे काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन जणांचे बळी गेलेत. 


दरम्यान, ड्रेनेज काम करताना ढिगाऱ्याखाली एक तरुण अडकल्याची बातमी मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीनं या तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परंतु, हे काम सुरू असताना चार जवान या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.  परंतु, सावध असलेल्या अग्निशमन दलाच्या इतर अधिकाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय. त्यांनी पहिल्यांदा ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सरोज पुंडे या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला बाहेर काढलं. त्यानंतर त्यांनी निखिल गोगावले या कर्मचाऱ्यालाही सुखरुपपणे बाहेर काढले.