Smruddhi Mahamarg Accident : विदर्भ क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्युरेटर प्रवीण हिंगणीकर (Pravin Hingnikar) यांचा कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Car Accident) झाला. हा अपघात इतका भीषण होता की प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर प्रवीण हिंगणीकर गंभीर जखमी झाले आहेत. हिंगणीकर आपल्या पत्नीसह क्रेटा कारमधून नागपूरला परतत होते. यावेळी मेहकरजवळ त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समृद्धी महामार्गावर अपघात
प्रवीण हिंगणीकर यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये (Vidarbha Cricket Association) विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. नुकतीच त्यांची बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्युरेटर (Peach Curator) म्हणून नियुक्ती झाली आहे. आज दुपारी साडेतीन वाजता बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातल्या लासुरा फाट्याजवळ त्यांच्या क्रेटा कारला अपघात झाला. याआधी मार्च महिन्यात झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तर 7 जण गंभीर जखमी झाले होते. अर्टिका गाडीला झालेल्या अपघातात दोन लहान मुलांसह तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चुराडा झाला.


समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. 11 डिसेंबर पासून सुरु झालेल्या या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर केवळ 5 तासांच पार करता येत आहे. मात्र उद्घाटनापासूनच या महामार्गावर अपघात (Accident News) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या 100 दिवसात 900 पेक्षा अधिक अपघात झालेत. यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात रोखण्यासाठी नागपूर ते शिर्डी दरम्यान 8 समुपदेशन केंद्र उभारली जाणार आहेत.


समृद्धी महामार्गावर अवजड वाहनांसाठी प्रतितास 80 किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी प्रतितास 120 किलोमीटरची वेगमर्यादा नेमूण देण्यात आली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालविणे, नियमाचे उल्लंघन करून अन्य वाहनांना मागे टाकणे अशा काही कारणांमुळे या महामार्गावर भीषण अपघात होत आहेत. 


समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे आणि कारवाईबाबतचे निर्णय
- वेगाने वाहन चालवणे, टायर मध्ये हवा नसने
- लेन शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल
- अती वेगात वाहन चालवणे
- नागपूर ते शिर्डी दरम्यान प्रत्येक जिल्यात एक प्रमाणे आठ समुपदेशन केंद्र उभारले जाणार
- भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्याना थांबवून समुपदेशन केले जाणार
- यात सक्तीच्या समुपदेशनात जवळपास 30 मिनिट ते 1 तास समुपदेशन केले जाणार आहे.  
- वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांना प्रथम रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करणारी छायचिण दाखवली जाणार
- एक प्रश्नपत्रिका सोडवून घेत, नियमात वाहन चालवण्याचे शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे.
- सर्व मार्गावर रस्ता सुरक्षा फलक लावले जाणार आहेत. 
- टोल नाक्यावर पीए सिस्टिम लावले जातील.
- ट्रक चालकांसाठी विश्रांती आणि पार्किंग व्यवस्था निर्माण केली जाईल.