Shocking News : गव्हाच्या पिठाच्या घमेल्यात पडला आणि... 9 महिन्याच्या लेकराचा आईच्या डोळ्यादेखत मृत्यू
गव्हाच्या पिठानं भरलेलं घमेलं बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलं आहे. डोळ्यादेखत लेकराचा जीव गेल्याने माऊलीला मोठा धक्का बसला.
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापुर : मुलांकडे डोळ्यात तेल लक्ष ठेवण्याची गरज आहे. थोडासं देखील दुर्लक्ष अथवा हलगर्जीपणा केल्यास तो मुलांच्या जीवावर बेतू शकतो. कोल्हापुरमध्ये (Kolhapur) अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गव्हाच्या पिठाच्या घमेल्यात पडून नऊ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे (Accidental death of baby). आईच्या डोळ्यासमोरच या लेकराने जीव सोडला आहे.
कोल्हापुर जिल्ह्यातील वडणगे येथील जुना वाशीनाका परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन तो पिठाच्या घमेल्यात पडल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. कृष्णराज राजाराम यमगर (वय 9 महिने) असे मृत बाळाचे नाव आहे. दुर्घटना घडताच चिमुकल्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापुरातील जुना वाशीनाका येथे राहणाऱ्या सुप्रिया राजाराम यमगर या आपला नऊ महिन्याचा मुलगा कृष्णराज याला घेऊन करवीर तालुक्यातील वडणगे येथे आपल्या आजीकडे आल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास कृष्णराज वॉकरमधून चालत खेळत होता. मात्र चालता-चालता त्याचा तोल जाऊन तो गव्हाच्या पिठाने भरलेल्या घमेल्यात पडला.
घमेल्यात मोठ्या प्रमाणात पीठ असल्याने कृष्णराज जवळपास या पिठात बुडालाच. कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ गेले आणि ते पीठ त्याच्या नाका-तोंडात चिकटून बसले. त्यानंतर ही बाब आजीच्या लक्षात आली, त्यानंतर आजीने त्याला गव्हाच्या पिठाच्या घमेल्यातून बाहरे काढले आणि कुटूंबियांना ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू होण्यापूर्वी चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नऊ महिन्यांच्या बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये हंबरडाच फोडला. परिसरात याबाबतची माहिती करतात सर्वांमधून हळहळ व्यक्त होऊ लागली. दरम्यान, आता या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.