पत्नी नांदायला येत नाही, संतापलेल्या पतीने सासूवर असा उगवला सूड
पत्नी आणि मुलगीही त्याच्या तावडीने सुटले नाहीत, घटनेने नाशिक हादरलं
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी नांदायला येत नाही या कारणावरुन संतापलेल्या पतीने सासूवर सूड उगवला. यात त्याने आपली पत्नी आणि मुलीलाही सोडलं नाही.
काय आहे नेमकं प्रकरण?
किसन महादु पारधी याचं लग्न झारवड इथल्या कमळाबाई सोमा भुतांबरे यांच्या मुलीशी झालं होते. त्याची पत्नी इंदुबाई किसन पारधी ही सासरी नांदायला जात नव्हती. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास किसन पारधी याने पत्नी इंदुबाई पारधी सासरी नांदावयास का येत नाही अशी कुरापत काढुन वाद घातला.
आरोपी किसनने आधी पत्नी इंदुबाईवर विळ्याने हल्ला केला. यावेळी सासू कमळाबाई यांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या किसनने सासूवरही विळ्याने वार केला. या हल्ल्यात सासू कमळाबाई भुतांबरे जागीच ठार झल्या. किसनने पत्नी इंदुबाई आणि मुलगी माधुरी यांच्यावर हल्ला केला. यात त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
आरोपी किसन पारधीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.