ठाण्यातले ४५० लाऊंज बार, हुक्का पार्लर सील करण्याचे आदेश
अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याबद्दल ७२ तासांची नोटीस देऊनही त्याची दखल न घेणाऱ्या लाऊंज बार आणि हुक्का पार्लर सील करण्याचा निर्णय ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय.
ठाणे : अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याबद्दल ७२ तासांची नोटीस देऊनही त्याची दखल न घेणाऱ्या लाऊंज बार आणि हुक्का पार्लर सील करण्याचा निर्णय ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय.
आयुक्तांनी जवळपास ४५० आस्थापने तातडीने सील करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. ५०० चौरस फूटापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली हॉटेल्स, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर्सनी अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र सादर केलेलं नाही किंवा आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत तरतुदींचे पालन केलेले नाही, अशा सर्व आस्थापनांना २६ सप्टेंबरला सात दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती.
एकाही आस्थापनेने कागदपत्र सादर न केल्यामुळे पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधित आस्थापनांना ३० डिसेंबरला ७२ तासांत कागदपत्रं सादर करण्याची नोटीस बजावली होती.
मात्र, या नोटीशीनंतरही कागदपत्रांची पूर्तता न करणा-या आणि आग प्रतिबंधक उपाययोजना न करणा-या आस्थापनांना तात्काळ सील करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिलेत. मुंबईतल्या कमला मिल अग्नितांडवानंतर ठाण्यात ही धडक कारवाई करण्यात येतेय.