केतकी चितळे प्रकरणात ट्विस्ट, पोलीस आता `या` दिशेने करणार तपास
केतकी चितळेला दिलासा नाहीच, जामीन अर्जावरचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketki Chitale) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. केतकी चितळेविरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर केतकीला ठाणे कोर्टाने तिला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रकरणाला नवं वळण
दरम्यान, केतकी चितळे प्रकरणाला आता नवं वळण लागलंय. शरद पवारांबाबतचा मेसेज केतकीला कुणी पाठवला? याचा तपास पोलीस करत आहेत. तिला कुणीतरही तो वादग्रस्त मेसेज पाठवला होता किंवा एखाद्या ग्रुपवरून तो आला होता, असा संशय पोलिसांना आहे.
केतकीनं तो मेसेज डिलीट केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळं तिचा मोबाईल फॉरेन्सिक चाचणीला पाठवण्यात येणार आहे. फेसबुकवरची मूळ पोस्ट 2020 सालची असताना, केतकीनं ती पुन्हा पोस्ट का केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
केतकीची कसून चौकशी
ठाणे गुन्हे शाखेने केतकी चितळे हिची पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्याची माहिती आहे. पोलिसांनी केतकीच्या घरातून तिचा लॅपटॉप आणि अन्य काही गोष्टीही ताब्यात घेतल्या होत्या. तिचा मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलची सायबर सेलकडून तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल ठाणे गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे. मात्र, या अहवालातील नेमका तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही.
केतकीचं समर्थन नाही पण...
अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्तव्याचं समर्थन नाही, मात्र तिला दिलेल्या वागणुकीचा निषेध असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. पवारांनी संस्कार आणि संस्कृती शिकवण्याची गरज नाही. त्यांचे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र शिकला तर माती होईल, अशी जोरदार टीकाही पडळकर यांनी केली आहे.