मुंबई : राज्यातील बहुतांश भागांमध्ये बसलेला अतिवृष्टीचा तडाखा पाहता अनेक नेतेमंडळींनी या प्रभावित क्षेत्राला भेट देण्याची सत्र सुरु केली. अगदी ज्येष्ठ नेतेमंडळी, सत्ताधाऱ्यापासून विरोधकांनीही बळीराजाशी संवाद साधण्यासाठी या मराठवाडा, सोलापूर भागाची वाट धरली. आता ही पावलं कोकणच्या दिशेनंही वळणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे नेतेमंडळींचे हे पाहणी दौरे सुरु असतानाच शेतकऱ्यांना मात्र आपल्याला लवकरात लवकरत मदत मिळावी अशी माफक अपेक्षा आहे. पण, यातही सुरु असणारे राजकीय आरोप- प्रत्यारोप पाहता नेतेमंडळींना आता आत्मचिंतनाची गरज असल्याचा सूर खासदार, छत्रपती संभाजी राजे यांनी आळवला आहे. यासाठी त्यांनी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या एका आदेशाचं सर्वांनाच स्मरणही करुन दिलं आहे. 


अतिशय स्पष्ट शब्दांत जनतेसाठी महाराजांनी दिलेल्या या आदेशाला अनुसरुन संभाजीराजेंनी लिहिलं, 'सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोचवा. शिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा. पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे'. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आदेशात, राजांनी नेमकं काय म्हटलं होतं? 


कष्ट करुन गावोगावी फिरा. शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलजोडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे द्या. खंडी, दोन खंडी धान्य द्या. दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडीने करु नका. मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी तरी चालेल'.



 


जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वी राजांनी दिलेल्या या आदेशाचं आज पालन केलं गेलं तर परिस्थिती काही वेगळी असेल, अशीच एकंदर भूमिका संभाजीराजेंनी ही अतिशय लक्षवेधी पोस्ट शेअर करत मांडल्याचं पाहायला मिळालं.