राजापूर : रत्नागिरीतील नाणार येथे होणार प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आता राजापूरमध्ये होण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरीतील नाणार ही जागा बदलली असली तरी आता जिल्ह्यातील बारसू येथील १३ हजार एकर जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारीमध्येच यासंदर्भात पत्र पाठविले आहे. स्थानिकांची विरोधाची भावना लक्षात घेता नाणारचा रिफायनरी प्रकल्प जिथे विरोध होणार नाही आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही,अशा जागी सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे,असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.


या विषयावर सकाळीच मुख्यमंत्री यांच्याशी बोलणं झालंय. जी नवी जागा शोधली आहे तेथे त्या नव्या पर्यायी जागेत अजिबात झाडे नाहीत. महाराष्ट्रात चांगले प्रकल्प हवे आहेत. पण, प्रकल्प आणत असतो तेव्हा स्थानिकांना विश्वासात घेऊनच आणतो. 


नाणारमधून हा प्रकल्प बाहेर आणला. पण, दुसरी जागा मागितली आहे. तेथील स्थानिक भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल याकडे लक्ष दिले जाईल तसेच त्यांना विश्वासात घेतलं जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 


रिफायनरी प्रकल्पासाठी लागेल तेवढी जागा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविलं आहे. पण, पंतप्रधानांनी अद्याप का उत्तर दिले नाही ते त्यांनाच विचारा, असे सांगत नाणारचा चेंडू पंतप्रधानांच्या कोर्टात टोलवला.