सिंधुदुर्ग : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपबाबत मोठे विधान केलंय. बिगर भाजप राज्यात राजकीय षडयंत्र सुरु आहे. पण त्यांना टक्कर द्यायला आम्ही सज्ज आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे सध्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, नाणार प्रकल्पासाठी येथील स्थानिकांचा विश्वास महत्वाचा आहे. विरोध आणि सत्ताधारी अशा दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेणार आहे.


या प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधत आहोत. प्रदूषण होणार नाही अशाच ठिकाणी हा प्रकल्प होईल. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून त्याची माहिती मुख्यमंत्री यांना देणार आहे. त्यानंतरच या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे ते म्हणाले.


सिंधुदुर्ग येथे राजकीय मोर्चेबांधणीपेक्षा पर्यावरणावर विशेष भर देत आहे. सिंधुरत्नला जे वचन दिले होते ते आम्ही पूर्ण करतोय. एअरपोर्ट व मेडिकल कॉलेजचे वचन आम्ही पूर्ण केलंय. रत्नागिरी एअरपोर्टला १०० कोटी देतोय. चिपी विमानतळ असेल. सागरी महामार्ग असेल, काही कामे झाले काही होत आहेत. येथील कामे वाढत आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग देशात यशस्वी ठरतोय. आम्ही एकमेकांविरोधात लढलोय त्यामुळे काही प्रमाणात नाराजी असणं स्वाभाविक आहे. पण, यात वरिष्ठ नेते लक्ष घालताहेत. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. मात्र, आता कोणताही भेदभाव न ठेवता पुढे जावं लागेल. एकमेकांच्या पक्षात असणारी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे ते म्हणाले. 


महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेल्यामुळे त्यांच्यात नैराश्य पसरले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारविरोधात राजकीय षडयंत्र सुरू आहे. बिगर भाजप राज्यातही तेच सुरु आहे. पण, भाजपच्या या षड्यंत्राला टक्कर द्यायला आम्ही सज्ज आहोत.


देशासमोरील विषय हे राजकारणापेक्षा महत्वाचे आहेत. हे कळलं पाहिजे. देशात जे घाणेरडं राजकारण सुरु आहे ते थांबलं पाहिजे. मात्र, भाजपकडून सातत्याने अन्यायाची वागणूक येतेय. जर आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे, असे सांगत त्यांनी आगामी काळातील भाजपसोबत मैत्रीचा विषय आदित्य ठाकरेंनी संपवला.