अतिदुर्गम भामरागडमध्ये आरोग्य विभागाची कौतुकास्पद कामगिरी`, शेवटच्या टोकावरील बिनागुंडा भागात 87 % लसीकरण
गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी गावांमध्ये लसीकरणाबाबत भय
आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : बिनागुंडा-फोदेवाडा-पेरमिलभट्टी-कुवाकोडी ही नावे ऐकलीय कधी. महाराष्ट्राला तशी गरजही नाही. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातल्या याच टोकांवरच्या गावांमध्ये उन्हाळ्याचे केवळ चार महिनेच रस्ते संपर्क होत असतो. एवढे समजले तरी गावांची दुर्गमता लक्षात यावी. याच गावांपासून नक्षली बालेकिल्ला असलेला छत्तीसगड राज्यातील अबुजमाडचा परिसर प्रारंभ होतो. अतिशय घनदाट जंगलात वसलेल्या या गावांना जाण्यासाठी बारमाही रस्ता देखील नाही.
देशभर कोरोनाचे थैमान सुरू असताना या गावांमध्ये या आजाराबाबत थोडीफार कल्पना आहे. तीही गैरसमजूत आणि अंधश्रद्धा यांचीच. कोरोना लसीकरणाबाबत देशात वेगवान मोहिमा आखल्या जात असताना या गावांमध्ये लसीकरण कसे करावे याबाबत प्रशासकीय पातळीवर मंथन होत होते. मात्र नेमकी योजना आखून गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी मनोज जिंदाल आणि भामरागडचे तरुण तहसीलदार अनमोल कांबळे यांनी या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील लसीकरण यशस्वी करून दाखविले आहे.
गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी गावांमध्ये लसीकरणाबाबत भय आहे. बिनागुंडा परिसरात अशी एखादी लसीकरण मोहीम राबविणे म्हणजे मोठे आव्हान होते. मात्र अधिकार्यांनी आपल्या चमूसह हे आव्हान स्वीकारले. या चमूत महिलांचाही समावेश होता हे विशेष. सर्वात आधी या परिसरातील गावांमध्ये कधी वाहन कधी तर कधी नावेने प्रवास करत अधिकारी पोहोचले. स्थानिक कोतवाल- पोलीस पाटील यांच्या पाठिंब्याने गावाची बैठक आयोजित केली गेली.
आधी गावाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आणि त्यानंतर गावाचे मत विश्वासात घेतल्यावर कोरोना लसीकरणाबाबत चर्चा केली गेली. लसीकरणाचा निर्णय गोटूल ( आदिवासींची स्थानिक निर्णय समिती) वर सोपविण्यात आला. अखेर आदिवासींच्या गोटुलमध्ये लसीकरणाबाबत चर्चा झाली आणि लसीकरणाला मान्यता दिली गेली.
एकदा लसीकरणाबाबत अनुकूल वातावरण तयार झाल्यानंतर पथकाने ठरविल्याप्रमाणे मतदान केंद्र निहाय लसीकरण शिबिरे सुरू केली. यात या भागातील 45 वर्षावरील 69 नागरिकांपैकी 58 आदिवासींनी लस टोचून घेतली. हे लिहिणे जेवढे सोपे आहे तेवढे करणे मात्र निश्चित नाही. या भागात लसीकरणाबाबत विविध गैरसमज आहेत. याशिवाय नक्षल्याचे भय वेगळेच. मात्र तरीही नेमकी योजना आखून पुढचा पावसाळा लक्षात घेता अधिकाऱ्यांनी केलेले नियोजन यशस्वी ठरले आहे.
यात महत्त्वाची ठरली ती अधिकाऱ्यांची मानसिकता. अगदी सहजपणे बिनागुंडा परिसर अतिदुर्गम असल्याने लसीकरण होऊ शकलेले नाही. अशी सबब अधिकाऱ्यांना सांगता आली असती. मात्र बिनागुंडा येथिल लसीकरण सफल झाल्यास त्याचा परिणाम आसपास सर्वच भागातील आदिवासी जनतेवर होईल असा ठाम विश्वास अधिकाऱ्यांना होता. आणि म्हणून अडथळ्यांची पायवाट तुडवत अधिकाऱ्यांनी कोरोना विरोधातील लढा यशस्वी केला.