ठाणे : मुंबईतील चर्चगेट स्टेशनवर होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ठाण्यात टीएमसी बस स्थानक परिसरात जाहिरातीचा भलामोठा फलक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी जाली नाही. वादळी वारे जोरात वाहत असताना नागरिकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र अशा घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबईत अंगावर झाड कोसळून आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आहे. अनिल नामदेव घोसाळकर असे या व्यक्तीचे नाव आहे. अंधेरी येथील महाकाली गुंफा रोड जवळील तक्षशिला सोसायटी इथं काल सकाळी ही दुर्घटना घडली. अनिल जोगेश्वरी येथे राहत असून अंधेरीत चालक म्हणून काम करतात. फोनवर बोलत असताना त्यांच्या अंगावर अचानक झाड कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे निधन झाले. 


दुसऱ्या एका घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाला. मालाडमध्येही पश्चिम येथील नारियलवाला कॉलनी परिसरात झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. सकाळी साडे सहा वाजता पूजा करण्यासाठी मंदिरात जात असणाऱ्या 38 वर्षीय शैलेश राठोड यांच्या अंगावर झाड कोसळले.  याविषयी महानगरपालिकाकडे इमारतीमध्ये राहणाऱ्या महेश पांड्या यांनी झाड धोकादायक असल्याची तक्रार 24 एप्रिल रोजी केली होती. तरी देखील याकडे महानगरपालिका कडून दुर्लक्ष केले. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.