COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : महसूल खात्याकडून आपल्यापैकी अनेकांनी शेतीच्या उत्पन्नाचा दाखला मिळवला असेल. मात्र जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावातील शेतकरी हिरालाल पाटील यांनी शेती तोट्यात गेली म्हणून उणे उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवला आहे. राज्यातला उणे उत्पन्नाचा हा पहिलाच दाखला असल्यानं त्याला अगळंवेगळं महत्त्व प्राप्त झालंय. 


मंगरूळ गावातील हिरालाल पाटील हे शेतकरी राज्यात चर्चेत आले होते, ते त्यांना 4 हेक्टर 80 आर क्षेत्रावरील शेतीत आलेल्या 1 लाख 96 हजार 667 रुपयांच्या उणे उत्पन्नाच्या दाखल्याच्या मागणीवरून...त्यांच्या या मागणीनं महसुली अधिका-यांची झोप तर उडालीच होती, पंरतू दाखला मिळावा यासाठी त्यांनी अधिका-यांचा पिच्छाही तेवढाच मुद्देसुदपणे सादर केलेल्या 29 पानांचा अर्ज करून पुरवला होता. 


शेतीत लावलेलं भांडवल आणि आलेल्या उत्पन्नाचा ताळेबंद त्यांनी अर्जात सादर केला होता. त्यात कृषी मूल्य आयोगाने जाहीर केलेला दर आणि प्रत्यक्षात मिळत असलेल्या बाजारभावाचे पुरावे जोडण्यात आले होते. अखेर अमळनेर तहसीलदारांना पाटील यांना उणे उत्पन्नाचा दाखला द्यावाच लागला. 


हिरालाल पाटील हे उणे उत्पन्नाचा दाखला मिळवणारे महाराष्ट्रातील पहिलेच शेतकरी आहेत. त्यांना मिळालेल्या उणे उत्पन्नाच्या दाखल्याचा आधारे आता शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आलीय. 


तहसीलदाराकडून मिळालेला उणे उत्पन्नाचा दाखला सरकारी स्वरूपात नाही. त्यामुळे भविष्यात सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी या दाखल्याच्या उपयोगीतेबाबत अधिका-यांमध्येही संभ्रम आहे. असं असलं तर या दाखल्याचा उपयोग काय असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.