सोनू भिडे, नाशिक: 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या पाच वर्षापासून सप्तशृंगी गडावरील बोकड बळीची प्रथा बंद आहे. मात्र यंदाच्या नवरात्रोत्सवात दसऱ्याला बोकड बळीची प्रथा सप्तशृंगी गडावर अटीशर्ती सह पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने बोकड बळीची प्रथा अटीशर्तीसह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 


अशी आहे बोकड बळीची प्रथा


नवरात्रोत्सवाची सांगता दरम्यान दसऱ्याच्या निमित्ताने सप्तशृंगी गडावर *नवस पूर्ण करण्यासाठी *बोकड बळी देण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. यादिवशी बोकड्याची गावातून वाद्यासह मिरवणूक काढली जाते. गडावरील दिपमाळ परीसरातील दसरा टप्प्यावर बोकड्यास नेवून पांरपारीक पध्दतीने पुजाअर्चा करुन बळी दिला जातो. बोकडबळी देतांना सप्तश्रृंगी देवी न्यासाच्यावतीने मानवंदना म्हणून हवेत गोळीबार केला जातो. या विधीत भाविकांची मोठी गर्दी होत असते. बळी दिल्याने आपली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. 


या कारणाने होती बंदी 


११ सप्टेंबर २०१६ रोजी दसऱ्याच्या दिवशी परंपरेनूसार बोकड बळीचा विधी सुरु होता. यावेळी न्यासाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मानवंदनाच्या गोळीबारात गोळीचे छरे उडून १२ भाविक जखमी झाले होते. यानंतर भविष्यात या प्रथेमळे अनुचित घटना घडू नये  याकरिता सप्टेंबर २०१७ पासून बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली होती. 


आदिवासी विकास सोसायटीने दाखल केली होती जनहित याचिका


आदिवासी बांधवाच्या सानिध्यात श्री सप्तशृंगी मातेचे स्थान आहे. धार्मिक कार्य करतांना बोकड बळी देण्याची परंपरा आदिवासी समाजात आहे. यात श्रध्दा व लोकभावना असल्याने बोकड बळी दिला नाही तर गडावर दरड कोसळणे, अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्ती येवून दुर्घटना होवू शकतात असा समज भाविकांमध्ये आहे. यामुळे बोकड बळी प्रथा पुन्हा सुरु करावी अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती. आज दिंडोरी तहसीलदार प्रशासनाने आपली बाजू मांडताना सप्तशृंगी देवी ट्रस्ट ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे प्रथा सुरू करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच सुरू झाल्यास योग्य रीतीने ते केले जाईल अशी ग्वाही कोर्टामध्ये दिली उच्च न्यायालयाने आज (२९ सप्टेंबर) अटीशर्ती सह बोकड बळी प्रथा सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने पाच वर्षानंतर बोकड बळी विधी पुन्हा सुरु होणार असल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.