लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासमोर नवे आव्हान; निवडणूक चुरशीची ठरणार?
Pankaja Munde : लोकसभेच्या मैदानात पंकजा मुंडे यांच्या विरोधात नवे आव्हान उभं राहिले आहे.
Loksabha election : भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत (Maharashtra BJP Candidate List) महाराष्ट्रातून अनपेक्षित नावं पहायला मिळाली. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागेवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली. बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने तिकीट तर दिले पण निडणुक जिंकायची कशी? अशी स्थिती पंकजा मुंडे यांच्यासमोर निर्माण होऊ शकते. कारण, लोकसभेच्या मैदानात पंकजा मुंडे यांच्या विरोधात नवे आव्हान उभे राहिले आहे.
बीडमध्ये यशवंत सेना पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. वेगवेगळ्या पक्षाकडून धनगर समाजाला केवळ आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. प्रत्यक्षात कुठलाही लाभ दिला जात नाही. आरक्षण प्रश्नानंतर धनगर समाजाच्या विकासाचा प्रश्न देखील प्रलंबित असून याच प्रश्नावर बीड लोकसभेच्या मैदानात यशवंत सेनेचा उमेदवार उतरवण्याचा निर्धार बीड मधील बैठकीत करण्यात आला आहे.
पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाच्या गावाला निधी दिला नाही. खासदार फंड तर आम्हाला माहीतच नाही त्यामुळे आता या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्या विरोधात उतरत असल्याचे धनगर समाज बांधवांनी म्हटले आहे. यशवंत सेनेचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी निवडणूक लढवावी असा देखील निर्णय झालेला आहे.
पंकजा मुंडेंचा वनवास संपला
भाजपाकडून खासदार राहिलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना तिसऱ्यांदा भाजप लोकसभेच्या रणांगणात उतरवणार की पंकजा मुंडे यांना भाजप दिल्लीला पाठवणार? याची चर्चा बीडमध्ये सुरु होती. अखेरीस भाजपने धक्कातंत्राचा वापर करत प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार तथा बंधू धनंजय मुंडे(dhananjay munde) यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांचा राजकीय प्रवास खडतर झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंवर भाजप पक्षाकडून कोणतीही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली नव्हती. अखेरीस भाजपने पंकजा मुंडे यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे.