दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. हा पराभव स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा सोपावला. कॉंग्रेस या धक्क्यातून सावरत नाहीत तोपर्यंत कॉंग्रेसला आणखी धक्का बसला आहे. विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विखे पाटील अधिकृतपणे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि कालिदास कोळंबकरही भाजपाच्याच मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी कमजोर करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फोडण्याची भाजपाची योजना आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपात प्रवेश करणार असून त्यांच्यासोबत काँग्रेसमधील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह आणखी काही आमदार भाजपात जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी उघडपणे आघाडी विरोधात काम केलंय. अशा नाराज आमदारांना आणि नेत्यांना गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आघाडीच्या उमेदवाराविरोधात काम केलं होतं, त्यांनाही आपल्या गळाला लावण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला असल्याचे समजते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भाजप कमजोर आहे आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे, अशा आमदारांनाही गळाला लावण्याची योजना भाजपाने आखली असल्याचे समजते. 


त्याचबरोबर मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हेही लवकरच भाजपात प्रवेश करतील, त्यांनी यापूर्वीच भाजपाचे उघडपणे कामही सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. काँग्रेसला पुढे भवितव्य नाही असा विचार करत काँग्रेसचेही काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते. काँग्रेसमध्ये राहिलो तर आपण निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी असे आमदार भाजपाशी जवळीक साधण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर काँग्रेसचे किती आमदार भाजपात जाणार याबाबत उत्सुकता आहे. 



मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यापूर्वीच पक्षाला रामराम केला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसला त्यानंतर झालेल्या विधानसभा, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपयशच पदरी पडलं आहे. त्यामुळे 2019 मधील दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अस्वस्थता आणखी वाढली आहे.