मुंबई :  सिंधुदुर्गात कणकवलीतील शिवसेनापुरस्कृत उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी जाणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. कणकवलीत शिवसेना पुरस्कृत सतीश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही जागा भाजपची असतानाही शिवसेनेने तिथे उमेदवार दिला आहे. सतीश सावंत हेच महायुतीचे उमेदवार असल्याचा दावाही शिवसेना करत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कणकवलीत जाऊन काय बोलणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या प्रचार सभेला जाणार आहे. नितेश राणे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला का जाणार नाही, असे सांगत आपण जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी या सभेत शिवसेनेवर टीका करणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या खास मुलाखतीत दिली होती. मुख्यमंत्री कणकवलीमध्ये प्रचारसभा घेणार नाहीत, असा दावा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केला होता, पण मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांनीही कणकवलीत प्रचार सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या दोन्ही सभांकडे लक्ष लागले आहे.


तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर नारायण राणेंनी माघार घेतलीय. शिवसेनेवर टीका करणार नाही अशी भूमिका कणकवलीचे भाजपा उमेदवार नितेश राणेंनी घेतलीय. 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका करणार नाही, असा सल्ला नारायण राणे यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर राणेंनी शिवसेना विरोधाची तलवार म्यान केली आहे. शिवसेनेवर टीका करणार नाही. मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळू, असे नितेश राणेंनी म्हटले आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला सल्ला राणेंना होता असे म्हटले आहे.