लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादी
अखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. लोकसभेतील पराभवनंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
Pankaja Munde : लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडेंची लवकरच विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे. विधानपरिषेसाठी भाजपने पाच नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंकजा मुंडे यांचे देखील नाव आहे.
पंकजा मुंडे विधानपरिषेदवर
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 13 जुलैला निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेसाठी एकूण 10 नावं प्रदेश भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अखेर यापैकी पाच जणांची नावं भाजपकडून जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत पंकजा मुंडे यांच्यासह योगेश टीळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या यादीनुसार पंकजा मुंडे, महादेव जानकर, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ आणि माधवी नाईक यांचा नावांचा समावेश होता. भाजपने जाहीर केलेल्या यादीत महादेव जानकर, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ यांची नावे नाहीत. आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून विधानपरिषदेची रणनीती भाजपनं आखली आहेत.
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे महिला आणि बालविकास मंत्री होत्या. परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना पराभव केला. यानंतर लोकसभा निवडणुकीत बहिण प्रीतम यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनावणे यांच्या विरोधात निवडणुक लढवली. बजरंग सोनावणेंनी पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव केला. ओबीसी-मराठा वादाचा फटका त्यांना बसल्याचं मानलं जातंय. पंकजा मुंडेंना मानणारा मोठा ओबीसी वर्ग महाराष्ट्रात आहे. पंकजा मुंडेंना मंत्रीपद दिल्यास ओबीसी मतं पक्षाकडं वळतील, असं भाजपला वाटतं.