Gadchiroli ST Bus Viral Video: गडचिरोलीत एसटी बसची (Gadchiroli St Bus) दुरावस्था दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला होता. एसटीचे छप्पर अर्धवटस्थितीत तुटलेल्या अवस्थेत असतानाही भरधाव वेगात ती धावत होती. धोकादायक स्थितीत धावणाऱ्या बसमुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधीत विभागाचे यंत्र अभियंता श्री. शी. रा. बिराजदार (विभागीय यंत्र अभियंता, गडचिरोली) यांना निलंबित करण्यात आले आहे. (Msrtc Bus Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र. एमएच ४०वाय ५४९४ ही गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत होती. यावेळी वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पुर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचा व्हिडीओ विविध समाज माध्यमे व वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आला होता. माध्यमात हा व्हिडीओ वायरल झाल्यावर एसटी प्रशासनाने प्राथमिक चौकशी सुरू केली होती. यात ही बस त्रुटींची पूर्तता न करता प्रवासी वाहतुकीला उपलब्ध करून दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू असेपर्यंत बिराजदार यांना निलंबित करण्यात आले आहे. जनमानसातील एसटीची प्रतिमा मलीन झाल्याने ही कारवाई केल्याचा उल्लेख आहे. यापुढे असे वाहन त्रुटीपूर्तता करूनच प्रवासी सेवेत उतरविण्याचे राज्यस्तरीय निर्देश सर्वच आगारांना दिले गेले आहेत.  


तसंच, वाहनाची दुरूस्ती अथवा वाहन बांधणीतील त्रुटी न काढता कोणतेही वाहन प्रवासी वाहतूकीसाठी न वापरण्याच्या सुचना राज्यातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.


एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. दरम्यान या चर्चित बसच्या दुरुस्तीचे काम फेब्रुवारी 2023 पासून सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहेरी आगाराच्या बसेस 300 किमी परिघात खड्डेमय रस्त्यांवर धावत असून परिणामी एसटी बस तुलनेने लवकर नादुरुस्त होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चर्चित बस सेवेतून बाहेर काढून विभागीय एसटी कार्यशाळेत संपूर्ण दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. 


व्हायरल व्हिडिओत काय?


एसटी बसचा व्हायरल व्हिडिओ गडचिरोलीतील आहे. बसचे छत तुटलेले आहे तरीही न थांबवता बसचा चालक ती दमटवत पुढे नेत आहे. लाल परीचे छत पूर्णपणे तुटलेले आहे. मात्र असे असतानाही भरधाव वेगात ही बस पुढे धावत आहे. या एसटीच्या पुढे असलेल्या वाहनातील इसमाने हा व्हिडिओ काढला आहे. 



एसटीची दुरावस्था


एसटी बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. गाव खेड्यात अजूनही एसटीनेच प्रवास केला जातो. अनेक आगारातील एसटी बसेसच्या फुटलेल्या काचा, फाटलेल्या सीट आणि पत्रा गंजलेला अशा अवस्थेत दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. एसटीच्या ताफ्यातील अनेक बसेसची दुरावस्था झाली आहे. काही बस या मोडकळीस आलेल्या आहेत. तरीही ग्रामीण भागात सर्रास या बस सोडल्या जातात.