प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : 'सहयाद्री प्रतिष्‍ठान' या संस्‍थेने मागील १० वर्षांपासून दुर्गसंवर्धनाचा वसा  हाती घेतला आहे. या संस्थेने रेवदंडा येथील आगरकोट किल्‍ल्‍यावरील अडगळीत पडलेल्‍या तोफांना उर्जितावस्‍था प्राप्‍त करून दिली आहे. प्रतिष्‍ठानच्‍या कार्यकर्त्‍यांनी किल्‍लयावर स्‍वच्‍छता मोहीम राबवत तेथील तोफा व्‍यवस्थित रचून ठेवल्‍या आहेत. त्याचप्रमाणे आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्‍याचा संदेश देखील दिला आहे .संस्‍थेच्‍या माध्‍यमातून मागील काही दिवसांपासून रेवदंडा येथील आगरकोट किल्‍ल्‍यावर ही मोहीम सुरू करण्‍यात आली होती. या मोहीमोत जवळपास ७० शिवप्रेमींनी भाग घेतला.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आगरकोट किल्‍ला आणि त्‍यावरील ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित राहिला आहे. सहयाद्री प्रतिष्‍ठानने तो जपण्‍याचा छोटा प्रयत्‍न केला आहे. या किल्‍ल्‍यावर सापडलेल्‍या तोफांची नोंदणी करण्‍यात आली आहे. त्‍यासंदर्भातील सविस्‍तर अहवाल संस्‍थेमार्फत राज्‍य सरकार तसेच पुरातत्‍व विभागाला सादर केला जाईल.' अशी प्रतिक्रिया दुर्गसंवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली आहे. 


स्‍वच्‍छता मोहीमेमुळे किल्‍ल्‍यावरील अडगळीच्‍या वाटा मोकळया झाल्‍या आहेत. त्यामूळे पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी चांगला मार्ग उपलब्‍ध झाला आहे. या किल्‍ल्‍याच्‍या परीसरात वस्‍ती आहे. मात्र किल्‍ल्‍याच्‍या दुरवस्‍थेकडे कुणाचेच लक्ष नव्‍हते. 


यात स्‍वच्‍छता मोहीमेबरोबरच किल्‍ल्‍यावरील अडगळीत पडलेल्‍या मातीखाली गाडल्‍या गेलेल्‍या तब्‍बल ३४ तोफा बाहेर काढण्यात आल्या. त्‍यांची नोंदणी करून त्‍यांना क्रमांक देण्‍यात आले. सह्याद्रि प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाडेकर, उपाध्यक्ष आषिश थळे,दुर्गसंवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी या मोहीमेचे नेतृत्‍व केले.