नाशिक योगेश खरे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीर जसे आजारी पडते तसे मनही आजारी पडू शकते. त्यामुळे रुग्णास साखळदंड , बेडी अथवा दोरात बांधून देवस्थानी ठेवत अघोरी कृत्य करणे योग्य नाही.  तर त्यास मानसोपचार तज्ञाची गरज असते. मात्र नाशिकमध्ये भगताच्या माध्यमातून असे उपचार गोदावरी काठी सर्रास केलं जातायत विशेषतः अमावस्येच्या दिवशी हे प्रकार होतात. नाशिक जिल्ह्यातील निफाड भागात असाच एक प्रकार उघड झाला


निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाची हातपाय पाय दोरीने बांधुन त्याची अघोरी पुजा करण्याचा प्रयत्न झाला. पिडीत हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याने नातेवाईकांनी त्याला अनेक देवस्थानी ठेवले. इतकेच नव्हे तर पायात लोखंडी बेडी घातली.परंतु इलाज काही येत नव्हता.शिरवाडे(वाकद) येथील एका भगताने त्यांना अघोरी पुजा करण्यास सांगितली. त्यासाठी गोदावरी नदीत आंघोळ घालुन अघोरी पुजा करण्यात येणार होती.


मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास नातेवाईक व भगत मोर्विस येथे आले. नदीकाठी रहदारी पासुन  दुर अंतरावर एकांतात सर्व जमा झाले. गावकऱ्यांना हे संशयास्पद वाटल्याने ते तिथे गेले असता हा भयानक प्रकार समोर आला. मोर्विसचे पोलीस पाटील सोमनाथ पारखे व गावकरी गोरख कोकाटे यांनी तत्काळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना फोन करून या गंभीर घटनेची माहिती दिली. कृष्णा चांदगुडे यांनी हा जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा असल्याचे नातेवाईकांना सांगितले.पिडीतास मानसिक आजार असल्याने त्यास अशा अघोरी पुजे पेक्षा डाॅक्टरांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी पिडीतास बांधलेल्या दोरातुन मुक्त केले.व स्थानिक पोलीसांना घटनेची माहिती दिली व संबधित भगतावर कारवाई होण्याची मागणी केली.गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळे अघोरी प्रयत्न थांबला असल्याने त्यांचे परीसरात कौतुक होत आहे.