कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर उद्यापासून कोल्हापूरात मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. खासदार संभाजीराजे यांनी आज शाहू समाधीस्थळावरुन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला तसंच उद्या होणाऱ्या आंदोलनाचा आढावा घेतला. 


संभाजीराजेंचं मराठा समाजाला आवाहन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार संभाजीराजेंनी  समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी सांगितलंय. आंदोलनादरम्यान कोणत्याही लोकप्रतिनिधींना उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा. हे मूक आंदोलन शिस्तीत पार पाडायला हवं, आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.


मराठा आरक्षण प्रश्नी कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे.  यानंतर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे.


संभाजीराजेंच्या आंदोलनाला सरकारचा पाठिंबा


मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजेंच्या  आंदोलनाला सरकारचा पाठिंबा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.  उद्या कोल्हापूरला आंदोलनस्थळी  पालकमंत्री, मंत्री, आमदार उपस्थित राहतील. त्यांची भूमिका समजून घेऊन  राज्य सरकारच्या अखत्यारीत जे शक्य आहे ते करतील, अशी ग्वाही अजित पवारांनी दिलीय. त्याचबरोबर उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे त्यावर ५ जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.


अजित पवारांचा उदयनराजेंना टोला


 मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींना गाडा असं वक्तव्य खासदार उदयनराजेंनी केलं होतं. यावर बोलताना अजित पवार यांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे. 'सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं आहे ना, बोलणारेही लोकप्रतिनिधीच आहेत',  असं अजित पवार यांनी म्हटलं.