कोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन
कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.
अलिबाग : कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.
कोकण रेल्वेला रायगड जिल्ह्यात मोजकेच थांबे आहेत. त्यामुळे कोकणात किंवा दक्षिण भारतात जाणाऱ्या रायगडमधील प्रवाशांना या रेल्वेमार्गाचा काहीच फायदा होत नाही. या मार्गावर पेण हे मध्यवर्ती स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी पेण रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने पेण रेल्वे स्थानकावर मोर्चा काढण्यात आला.
पाऊस असूनही शेकडो महिला-पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते. पेण स्थानकावर हॉलिडे ट्रेन थांबाव्यात, पेण-पनवेल आणि रोहा-पेण शटल सुरु करावी, पेण ते सीएसटी अशी लोकल सेवा सुरु करावी, रिटर्न तिकीट सुविधा द्यावी, गणपती स्पेशल गाड्यांना पेण स्थानकात थांबा मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.