माणुसकी हरवली! गर्भवती महिलेची हेळसांड, रस्त्यातच झाली प्रसूती
महिला वेदनेत होती, पण डॉक्टर बघत राहिले, रुग्णालयात दाखल करुन घेण्यास दिला नकार
अहमदनगर : अहमदनगरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या मनमानी कारभारामुळे एका महिलेची रस्त्यात प्रसूती झाली. अहमदनगर जिल्ह्यात देवळाली प्रवरामध्ये कमल शिंदे ही महिला प्रसूतीसाठी ग्रामीण रूग्णालयात गेली होती. मात्र तिथे तिला दाखल करून घ्यायला प्रशासनानं नकार दिला.
महिलेच्या नातेवाईकांनी अनेक विनवण्या केल्या. पण ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर नाईलाजास्तव या नातेवाईकांनी महिलेला खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र खासगी रुग्णालयात नेत असताना मध्येच रस्त्यात महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या.
यावेळी परिसरातील स्थानिक महिला कमल शिंदे यांच्या मदतीला धावून आल्या. स्थानिक महिलांनी रस्त्यावरच कमल शिंदेची प्रसूती केली. या प्रकरामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गरीब रुग्णांची ग्रामीण रुग्णालायातील कर्मचारी हेळसांड करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, आरपीआयचे सुरेंद्र थोरात यांनी ग्रामीण रुग्णालयात ठिय्या देत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.