लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : काही दिवसांपूर्वी भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचे प्रकरण ताजे असतानच एका मुलीला फूस लावून तिच्यावर लग्नासाठी जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरच्या (Ahmadnagar crime) पाथर्डीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाथर्डी शहरातील एका विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून तिच्याच वर्गातील एका समाजाच्या अल्पवयीन मुलाने मैत्रिणीच्या मदतीने घरात डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पोलिसांनी (Ahmadnagar Police) याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी दुपारी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवीयन मुलाने मैत्रिणीच्या मदतीने हे सर्व कृत्य केल्याचे म्हटलं जात आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलगा आणि एक अज्ञात महिला आरोपीच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण विरुद्ध कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.


पीडीत अल्पवयीन मुलगी सकाळी 10 वाजता शाळेत गेली होती. मात्र आजारी असल्याने ती 11 वाजताच शाळेतून घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र तिच्याच वर्गातील अल्पवयीन मुलाने मुलीला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर अल्पवयीन मुलाने दुसऱ्या एका अज्ञात आरोपी मुलीची मदत घेवून पीडित मुलीला स्व:तच्या घरी नेत बंधक बनवले आणि लग्न करण्याची अट घातली. लग्न केले नाहीस तर तुझ्या कुटुंबियांना त्रास देईल अशीही धमकी अल्पवयीन मुलाने पीडितेला दिली. हा सगळा प्रकार हा ऐकून मुलीला जबर धक्का बसला.


मात्र त्यानंतर पीडीत मुलीने मुलाच्या घरातून पलायन करत घर गाठले आणि घडलेला सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. हा सगळा प्रकार समजताच सायंकाळी पोलीस ठाण्यात नागरिकांचा मोठा जमाव झाला होता. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आरोपीवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. दरम्यान या प्रकारात एका अनोळखी सज्ञान मुलीचा समावेश असल्याने या प्रकरणात देखील लव्ह जिहादचा कंगोरा आहे का? हे पोलीस तपासात उघड होणार आहे.