सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली लोकसभेची अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. नगरमधून काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीवर सुजय पाटील इच्छुक होते. त्यांनी आधीपासूनच निवडणुकीची तयारी केली होती. या जागेवर त्यांनी दावाही ठोकला होता. कोणत्याही परिस्थितीत ही जागा मी लढवणार आणि जिंकणार, असा विश्वासही व्यक्त केला होता. मात्र, या जागेवरील दोन्ही काँग्रेसमधील आघाडीत वितुष्ठ येण्याची शक्यता होती. सुजय पाटील यांनी पक्षाकडून उमेदावीर मिळाली नाही किंवा राष्ट्रवादीला ही जागा गेली तरी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे हातची जागा जाण्याची शक्यता होती. तसेच ते भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीर्घकाळ सुरू असलेला या जागेचा तिढा शरद पवार यांच्या घोषणेमुळे आता सुटला आहे. काँग्रेसकडून या जागेसाठी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय आग्रही होती. लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादीकडे तर शिर्डीची काँग्रेसकडे आहे. मात्र, डॉ. विखे यांनी नगरसाठी गेल्या दोन अडीच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. त्यामु‌ळे राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी मागणी होत होती. जागा वाटपाच्या बैठकांमधून यावर चर्चा होत असताना राष्ट्रीय निवड समितीपर्यंत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेही या जागेवर ठाम होते. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीकडून या जागेसाठी अनेक उमेदवारांची नावेही पुढे आणली जात होती. शेवटी काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांना पक्षात घेऊन त्यांना येथून राष्ट्रवादीचे उमेदवारी देण्याचे ठरले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा प्रवेशच रद्द करण्यात आला. 


नगरची जागा काँग्रेसला सोडावी यासाठी विखे यांच्याकडून विविध प्रयत्न सुरू होते. भाजपसह अन्य पक्षांत जाण्याची तयारी दर्शवत दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला, तर पवार ऐकत नाहीत हे पाहून विखे यांनी पवार आपल्याला पितृतूल्य असल्याचे सांगत त्यांनी नातवासाठी जागा सोडावी, असे साकडेही घातले होते. दरम्यान, या जागेवरून भाजपचा उमेदवार तीन वेळा विजयी झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सतत पराभव झाला आहे. मात्र, मागील निवडणुकांत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्त मते असल्याचे सांगत राष्ट्रवादीकडून ही जागा सोडण्यास नकार दिला गेला होता.