अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या अहमदनगरच्या राष्ट्रवादी नगरसेवकांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. उद्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या नगरसेवकांसोबत चर्चा करणार आहेत. २८ डिसेंबरला निवडणूक झाल्यानंतर त्याच दिवशी पक्षाने सर्व १८ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पक्षादेश डावलून भाजपाला मतदान करण्याबाबत खुलासा करण्याचे आदेश पक्ष नेतृत्वाने दिले होते. या नोटिशीची ७ दिवसांची मुदत संपल्यानंतरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता उद्याच्या चर्चेनंतर पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 


राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बंडखोरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता होती. मात्र, सात दिवस झाले तरी तसे काहीही झालेले नाही. या नगरसेवकांनी पक्ष भूमिका झुगारून भाजपला मतदान केले. यामुळे, नगरला अल्पमतात असलेल्या भाजपचा महापौर आणि उपमहापौर निवडून आला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची ही बंडखोरी पक्षाच्या भाजपाविरोधी लढ्याला सुरुंग लावणारी ठरली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने या नगरसेवकांकडून खुलासा मागवला. पाच जानेवारीपर्यंत उत्तर देण्याची मुदत या नगरसेवकांना देण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादीनेच या नगरसेवकांना मुंबईत पाचारण केले आहे.


दरम्यान, अहमदनगरमध्ये रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नगरसेवकांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. आता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना चर्चेच आमंत्रण दिले आहे. त्यामुळे उद्या कारवाई होणार की, सजम देऊन त्यांना पाठवणार याचीच चर्चा रंगत आहे.


 १८ नगरसेवकांना मुंबईत बोलवले


- कारणेदाखवा नोटीसची मुदत संपूनही भाजपाला मतदान करणार्‍या नगरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर अद्याप कारवाई नाही
- उद्या राष्ट्रवादीने त्या १८ नगरसेवकांना मुंबईत बोलवलं
- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या त्या १८ नगरसेवकांबरोबर चर्चा करणार
- अहमदनगरच्या महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराला केलं होतं मतदान
- त्याच दिवशी म्हणजे २८ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने कारणेदाखवा नोटीस बजावत सात दिवसात नगरसेवकांकडून मागितले होते स्पष्टीकरण
- सात दिवसांची मुदत संपल्यानंतर कारवाई नाही