मुंबई : महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या अहमदनगरमधल्या १८ नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही हकालपट्टी केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारुन भाजपला या नगरसेवकांनी मतदान केले होते. पक्षाचा आदेश डावल्याने त्यांना थेट पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही हकालपट्टी करण्यात आली. या १८ नगरसेवकांना नोटीस बजावून त्यांना आपले म्हणणे लेखी मांडण्याची संधी दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मदत करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. पक्षाने त्यांची हकालपट्टी करताना पक्षादेश डावलल्याने ६ वर्षांसाठी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. त्याशिवाय नगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. 


तर दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांना मात्र तुर्तास राष्ट्रवादीने अभय दिले आहे. जगताप यांनी भाजपला मतदान करणाऱ्या नगरसेवकांची बाजू घेत मीडियासमोर बाजू मांडली होती. आपण पक्ष  श्रेष्ठींना याची माहिती देवू असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्यावर पक्षाने कोणतीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, जगताप यांच्यावर कारवाई करण्याची गरज नाही. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तर याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यात येईल, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी मांडली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर कारवाई होणार, अशी बातमी सर्वात आधी झी २४ तासने ३० डिसेंबरला दिली होती. त्या बातमीवर आजच्या कारवाईमुळे शिक्कामोर्तब झाले आहे.