Ahmednagar News : राज्यात सध्या सगळीकडे विविध जत्रा, यात्रा, जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात तरुणाई डॉल्बी सिस्टम, डीजेचा (DJ) वापर करताना दिसत आहे. मात्र या उत्सवाच्या नव्या रुपाने एका शिक्षकाचा बळी घेतलाय. डीजेच्या आवाजामुळे अहमदनगरमध्ये (Ahmednagar) एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर महिनाभर या शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी शिक्षकाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पुण्यासारख्या शहरातून डीजे, मोठ्या साऊंट सिस्टमचे वेड आता गावा खेड्यात पोहोचलं आहे. गावाकडच्या भागात सध्या जयंती उत्सव, लग्न, यात्रेचा डीजे हा अपरिहार्य भाग झाला आहे. मात्र यामुळेच एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे.


अहमदनगरच्या श्रीगोंदा येथील नारायण आश्रमचे केंद्रप्रमुख असलेले शिक्षक अशोक बाबुराव खंडागळे (58) यांचा डीजेच्या आवाजाने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डीजेच्या आवाजाने त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. महिनाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी अशोक बाबुराव खंडागळे यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर खंडागळे कुटंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर नारायण आश्रम केंद्रावर अशोक खंडागळे यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.


शिक्षक अशोक खंडागळे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी अशोक खंडागळे हे कर्जत तालुक्यातील कौडाणे येथे गेले होते. तिथे खंडागळे यांना डीजेच्या आवाजाने त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच ते कोमात गेले. महिनाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कौडाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


डीजेच्या आवाजाने फाटले तरुणाच्या कानाचे पडदे


भंडाऱ्यामध्ये काही दिवसांपूर्वी लग्नात डीजेसमोर नाचताना एका तरुणाच्या कानाचे पडदे फाटले होते. लग्न कार्यानंतरही तरुणाच्या कानातून डीजेचा आवाज गेला नव्हता. आठवड्यानंतर तरुणाला ऐकू येणेच बंद झाले. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता तरुणाच्या दोन्ही कानाचे पडदे फाटल्याचे समोर आले आहे. नितीन लिल्हारे (30) असे या दुदैवी तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. नितीनच्या कानाची डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याच्या एका कानाचा पडदा पूर्णपणे फाटल्याचे समोर आले. तर दुसऱ्या कानातून केवळ 20 ते 30 टक्के आवाज ऐकू येणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.