अहमदनगर :  मतदान यंत्राची पूजा केल्याप्रकरणी अहमदनगरचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदमवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ईव्हीएम मशीन पुजा प्रकरण श्रीकांत छिंदमच्या अंगलट येणार आहे. मतदानाआधी ईव्हीएम मशीनची पुजा केल्याप्रकरणी श्रीकांत आणि त्याच्या सहकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. काल मतदान सुरू होण्याआधी तो पुजाऱ्याला घेऊन ईव्हीएम मशिनची पुजा करायला आला. 'आम्हाला सहकार्य होऊदे, आमच्या बाजुने निकाल लागूदे' अशा प्रकारचं साकडं त्याने ईव्हीएम मशिनला घातल्याचे सांगितल जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्यासोबत सात ते आठ सहकारी देखील यावेळी उपस्थित होते. कालच्या दिवसात हा मुद्दा दिवसभर गाजला. निवडणूक प्रक्रिया संपल्या संपल्यावर संध्याकाळी निवडणूक अधिकाऱ्यांनी या घटनेचा समाचार घेत तक्रार दाखल केली. त्यामुळे ईव्हीएमची पुजा छिंदमच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.


गुन्हा दाखल 


सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी श्रीकांत छिंदम आणि त्याच्यासह सात ते आठ जणांवरगुन्हा दाखल करण्यात आला.


याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीकांत छिंदमला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. श्रीकांत छिंदम वॉर्ड क्रमांक ९ मधून अपक्ष उभा आहे.