लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : शाळेसाठी विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) पत्र लिहिले आहे. अहमदनगर (Ahmednagar) येथे शाळेची जुनी इमारत पडल्याने नवीन इमारत बांधून मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगरच्या पारगाव भातोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेची इमारत जीर्ण झालेली धोकेदायक इमारत पूर्णपणे पाडली आहे. शाळेला इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये शिक्षण घ्यावं लागतं आहे. जिल्हा परिषदेच्या दिरंगाईमुळे शाळा बांधकामाला उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित शाळेची इमारत बांधून देण्याची विनंती केली आहे.


अहमदनगर शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव भातोडी या गावात शाळेची इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मंदिरात शिक्षण घ्यावं लागत आहे. गावच्या मंदिरात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा भरत आहे.
पहिली ते चौथी पर्यंतचे साधारण 100 च्या आसपास विद्यार्थ्यांना शाळेची जीर्ण झालेली इमारत पडल्यामुळे मंदिरात धडे गिरवावे लागत आहेत.


गावात1954 साली बांधलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र ती जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत होती. यासंबंधीचा अहवाल ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला दिलेला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे वर्ग बंद होते  तरी देखील शाळेचं बांधकाम झाले नाही.


आता शाळा सुरू झाली आहे मात्र इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मंदिरात बसावं लागतं आहे. शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी शाळेच्या इमारतीचं काम सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून शाळेचे बांधकाम सुरू करावा अशी विनंती केली आहे


जिल्हा परिषदेकडून अद्याप शाळेच्या बांधकामाला सुरुवात झाली नसली तरी ग्रामपंचायतीकडून शाळा निर्लेखित करण्यासाठी अहवाल पाठवला आहे आणि तो मंजूर ही करण्यात आला असल्याचं सरपंच आणि शाळेचे शिक्षक सांगतात


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आल्यापासूनच आपल्या कामांचा धडाका लावला आहे. नागरिकांची अडचण फोनवर जरी समजली तरी त्यावर तात्काळ कारवाई होताना पाहायला मिळत आहे. पारगाव भातोडी येथील विद्यार्थ्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना मिळाल्यानंतर ते काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे