`महाराष्ट्राला आज बाळासाहेबांची खरी...`; अभिनेता अजिंक्य देव भावूक
Ajinkya Deo About Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरेंसंदर्भातील आठवणींना उजाळा देताना अजिंक्य देव यांनी एकदा अचानक बाळासाहेब त्यांच्या शुटींगच्या सेटवर पोहोचल्याचा किस्सा सांगितला.
Ajinkya Deo About Balasaheb Thackeray: मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं कुटुंब म्हणजे देव कुटुंब. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्यापासून लाभलेला अभिनयाचा वसा पुढे अजिंक्य देव यांनी कायम ठेवला आहे. मराठीबरोबरच हिंदी तसेच अगदी हॉलिवूडपर्यंत आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या अजिंक्य देव यांचं नाव घेता आजही अनेकांच्या डोळ्यासमोर 'माहेरची साडी' हा चित्रपट येतो. अजिंक्य देव हे त्यांच्या स्पष्ट मतांसाठीही ओळखले जातात. नुकत्याच एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजिंक्य देव यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देत खंत व्यक्त केली.
ठाकरेंबरोबर खास नातं
बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना अजिंक्य यांनी त्यांना अनेकदा भेटलो होतो असं सांगताना एकदा तर लहान असताना मी त्यांच्या मांडीवर बसलेलो असंही सांगितलं. "बाळासाहेबांची भेठ घेण्यासाठी मी अनेकदा 'मातोश्री'वर गेलो आहे. ठाकरे कुटुंब आणि देव कुटुंबाचं एक खास नातं आहे. बाळासाहेबांचं कमाल वाटावं असं वलय होतं. लहानपणी या वलयाबद्दल माहिती नव्हतं. मी लहानपणी अगदी त्यांच्या मांडीवरही बसलो आहे. पुढे वय वाढत गेल्यानंतर त्यांच्याबद्दल कळू लागलं," असं अजिंक्य देव यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांची गरज होती...
बाळासाहेबांची आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राला गरज होती असंही अजिंक्य देव यांनी म्हटलं. "बाळासेहाब ठाकरे हे फार अद्भूत व्यक्तीमत्व होतं. माझ्या एका चित्रपटाच्या शुटींगदरम्यान ते स्टेजवर आलेले. त्यावेळी त्यांनी मला बापाचं नाव मोठं करशील असा आशिर्वाद दिला होता. त्यांचं बोलणं फारच स्फुर्तीदायक होतं. ते एखाद्या गोष्टीबद्दल प्लॅन न करता मनापासून बोलायचे," असं अजिंक्य देव यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं. तसेच पुढे बोलताना अजिंक्य देव यांनी, "महाराष्ट्राला आज आज बाळासाहेब ठाकरेंची खरी गरज होती," असंही म्हटलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य देव यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
नक्की वाचा >> '...त्यावेळी मला महाराष्ट्राची जाण नाही हे जाणवलं'; अजिंक्य देवनं सांगितला 'माहेरची साडी'चा 'तो' किस्सा
मी भाग्यशाली कारण...
"मला त्यांचा आशीर्वाद मिळाला यासाठी मी स्वत:ला फार भाग्यशाली समजतो. देव कुटुंबाला ठाकरे कुटुंबाने नेहमीच मदत केली आहे," असंही अजिंक्य देव यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. अजिंक्य देव यांचे वडील रमेश देव आणि आई सीमा देव हे दोघेही मराठी मनोरंजन सृष्टीमधील महत्त्वाचे कलाकार होते. दोघांचंही 2022 साली निधन झालं. देव दांपत्यचे ठाकरे कुटुंबाशी घरोब्याचे संबंध होते. त्यामुळे अजिंक्य देव यांना बाळासाहेबांचा सहवास याच घरोब्याच्या संबंधांमधून लाभला. बाळासाहेब ठाकरे हे कलासक्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे.