पुणे : एका कार्यक्रमानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघे एकाच व्यासपिठावर आलेत. यावेळी त्यांच्यातील टोलेबाजी उपस्थितांत चर्चेचा विषय झाला. भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला अजित पवार आणि  देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने तिथे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. (Ajit Pawar and Devendra Fadnavis together in Pune) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार आणि फडणवीस यांच्यात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात सत्तेसाठी झालेली औटघटकेची मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यामुळेच हे दोन नेते  काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पुण्यात भामा आसखेड धरण उदघाटनाच्या निमित्तानं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. आम्ही एकत्र येणार म्हणजे काय कुस्त्या खेळणार की गाणं म्हणणार असा सवाल करत टोला लगावला. तर आपण पुण्यातच असतो. त्यामुळे फडणवीसांच्या सोयीची तारीख घ्या आपण येऊ असं अजित पवारांनी नमूद केले. 


दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान या दोन नेत्यांच्या भाषणाआधी गोंधळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांच्या गोंधळानेच कार्यक्रम चर्चेत आला. कोरोनामुळे नियमांचे बंधन असले तरी या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातूनच गोंधळाला सुरुवात झाली.  यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी करण्यात आल्याने वातावरण चांगलेच गरम झाले होते.