पुण्याचे कारभारी अजित पवारच ! एका दादाच्या एण्ट्रीमुळे दुस-या दादाची एक्झिट?
अखेर पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला आहे. अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री असतील. तर, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी करण्यात आलीय.
Ajit Pawar : दोन महिन्यांपूर्वी पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवारांना पत्रकारानं प्रश्न विचारला. तेव्हा तुझ्या तोंडात साखर पडो असं मिश्किल भाष्य अजितदादांनी केलं होतं. अखेर पुण्याचे दादा आपणच हे अजित पवारांनी पुन्हा सिद्ध केल आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात पडलीय. चंद्रकांतदादांची पुण्यातून उचलबांगडी झाल्यामुळे पुण्यात अजित पवारांनी ताकद दाखवल्याचं बोललं जात आहे.
अजित पवारांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ का पडली असावी हे पुढे सांगणार आहोत मात्र त्याआधी महायुतीत काय काय घडामोडी घडल्या ते पाहुयात.. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री पदांचं वाटप आणि पुण्याचं पालकमंत्रीपद ही अजित पवारांच्या नाराजीची मुख्य कारणं सांगितली जात होती. अजित पवारांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्यामुळे या चर्चांना बळ मिळालं, शिंदे-फडणवीस अमित शहांच्या भेटीसाठी तातडीनं दिल्लीत रवाना झाले. त्याच सगळ्या गदारोळात पालकमंत्रीपदांचं वाटप झालं आणि पुण्याचे कारभारी दादाच दिसून आलं.
दादांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद जाण्याची कारण काय?
पुणे जिल्हा आणि शहर अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत, त्यापैकी 8 आमदार अजित पवारांसोबत आहेत. पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ असे 4 लोकसभा मतदारसंघ आहेत.
पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघात भाजपपेक्षा राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे. पालकमंत्रिपद मिळाल्यामुळे अजितदादा पक्ष आणि महायुती आणखी बळकट करतील. 2024 लोकसभेत भाजपच्या मिशन 45 + साठी दादांची ताकद अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळेच अजित पवारांना पालकमंत्रिपद देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं जातंय.
चंद्रकांतदादांचा पुण्यातून परतीचा प्रवास सुरु झालाय का?
कॅबिनेटच्या एका बैठकीला दादांनी दांडी मारली आणि सगळ्यांचीच हवा टाईट झाली लोकसभेच्या दृष्टीनं दादांची नाराजी महायुतीला परवडणारी नाही. त्यामुळेच तातडीनं दादांना पुण्याचं पालकमंत्री बनवण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र, यामुळे चंद्रकांतदादांचा पुण्यातून परतीचा प्रवास सुरु झालाय का? विधानसभेतही चंद्रकांतदादा पुण्यातून लढणार की नाही असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान, पालकमंत्र्यांच्या नव्या जबाबदा-यांवर भाष्य करण्यास चंद्रकांत पाटलांनी नकार दिलाय... पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आलीय.. त्यांच्या जागी पुण्याचे नवे पालकमंत्री म्हणून अजित पवारांची नियुक्ती करण्यात आलीय.. या घडामोडींबाबत विचारणा केली असता चंद्रकांत पाटील यांनी हात जोडून नमस्कार केला.