Ajit Pawar Shown Black Flags: भारतीय जनता पार्टीच्या जुन्नर तालुक्यातील विधानसभा प्रमुख आशा बुचकेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याने राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे आता महायुतीमध्ये खडा पडणार की काय? अशी चर्चा रंगलेली असतानाच अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आशा बुचकेंना चांगलेच फैलावर घेतलं आहे. बुचकेंनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार हा निव्वल स्टंटबाजी असल्याचा टोला रुपाली चाकणकरांनी लगावला आहे. या कृत्यामुळे महायुतीमध्ये खडा पडणार का? यावरही चाकणकर यांनी भाष्य केलं आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेत आज सकाळीच नारायणगाव येथील निलायम गार्डन मंगल कार्यालयात विविध बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. अजित पवारांचा ताफा या ठिकाणी पोहोचला असता भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केले. अजित पवारांनी घटक पक्षांना डावलून पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करतो असे म्हणज आशा बुचकेंसहीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली. अजित पवारांचा ताफा ज्या ठिकाणावरुन बैठकींचं आयोजन करण्यात आलेल्या सभागृहात जात होता त्याच मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं.


रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?


"बुचकेंनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवणे ही निव्वळ एक स्टंटबाजी होती," असं म्हणत अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनी बुचकेंची खिल्ली उडवली. "काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना भेटल्या असत्या तर प्रश्न मार्गी लागायला मदत झाली असती. पण केवळ बातम्या व्हाव्यात म्हणून बुचकेंनी ही स्टंटबाजी केली," असा पलटवार चाकणकरांनी घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना केला आहे.


महायुतीत खडा पडणार का?


बुचकेंच्या या अजित पवारविरोधी भूमिकेने महायुतीत कोणताही खडा पडणार नाही, असा दावा ही चाकणकरांनी केला आहे. "ही राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा असल्यानं अजित पवारांनी ही बैठक बोलावली होती. जागच्याजागी समस्यांचं निराकरण व्हावं म्हणून शासकीय अधिकाऱ्यांना बोलावलं होतं, याचा अर्थ ही शासकीय बैठक होती असा होत नाही," असं ही चाकणकरांनी स्पष्ट केलं. "विरोधातील काही नेत्यांना फक्त आमच्यावर बोलण्यात रस आहे, आम्ही अशा आरोपांना थारा देत नाही. जन सन्मान यात्रेच्या प्रत्येक दिवसाच्या शेवटी महायुतीचा बैठक होत आली आहे अन् ती यापुढं ही होईल," असा विश्वास चाकणकरांनी केला.