अजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे थेट दिल्लीतील नेत्यांसोबत याबाबत बोलणार असल्याचं समजत आहे. वादग्रस्त तसंच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणा-या भाजपा नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीत करणार आहेत. नितेश राणेंसह काही नेते मुद्दाम मुस्लिम धर्माविषयी वाद निर्णाण होणारी वक्तव्य वारंवार करतात यावरून अजित पवार गटाचे नेते नाराज आहेत. पत्रकार परिषद तसंच भाषणांच्या माध्यमातून भाजपा नेते करत असलेल्या वक्तव्याविरोधात अजित पवार यांच्या पक्षात नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रभारी, सहप्रभारी व महाराष्ट्र कोअर कमिटीसह निवडणूक संचालन समिती सदस्यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला प्रदेश मुख्यालयात बैठक होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील उमेदवारांबाबत या बैठकीत निश्चिती होणार असल्याची माहिती आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काही नावांची घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


दुसरीकडे महायुतीत जागावाटपावरून एकमत झाल्याची माहिती आहे. 150 ते 170 जागांवरील दावेदारी निश्चित आहे. विद्यमान आमदारांचे मतदारसंघ आहे त्याच पक्षाकडे कायम राहणार असं सूत्रांकडून समजत आहे. उर्वरित जागांचा तिढा सोडवण्यासाठी अमित शाहांच्या बैठकीत निर्णय होणार आहे. तर काही जागांवर स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून अदला बदलीचीही शक्यता आहे. 


"लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही"


लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार नसल्याचं मोठं विधान शरद पवारांनी केलं आहे. आगामी विधानसभेत मविआ जिंकणार असल्याचा विश्वासही शरद पवारांनी केला आहे. एका मुलाखतीत शरद पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वावरही शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलं. कोरोना काळात ठाकरेंनी चांगलं काम केल्याचं शरद पवार म्हणालेत तर सुप्रिया सुळे दिल्लीत खुश असल्याचं शरद पवार म्हणालेत. त्यामुळे सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात येणार नसल्याचंही शरद पवारांनी अप्रत्यक्ष सांगितलं आहे.