Ajit Pawar Talks About Pawar Family: पवार कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. याच वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या गटाने राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तसेच अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का दिला. आपणच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा या गटाने केला आहे. एकीकडे या दोन्ही गटांमध्ये राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या मागील 7 महिन्यामध्ये अनेका भेटी झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी हे सूचक विधान केलं आहे.


स्टॅम्पपेपरवर लिहून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांच्या आमदार तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यानच अजित पवार यांनी हे विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्या सोबत आलेल्यांना फसवायचं नाहीये. त्यामुळे घेतलेल्या भूमिकेत बदल करणार नाही. हे स्टॅम्पपेपरवर लिहून देतो की भूमिका बदलणार नाही, अशी ग्वाही या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाईटपणा कशाला घ्यायचा असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचा विचार तुम्ही करु नका असा सल्लाही या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 


कार्यकर्ते संभ्रमात पडतात आणि...


पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवारा यांनी दिवाळीच्या काळात समोर आलेल्या फोटोंमुळे अनेकांचा संभ्रम झाल्याचा उल्लेख केला. "पाठीमागच्या काळात दिवाळी, भाऊबीजेचे फोटो पाहिले की कार्यकर्ते आणि नेतेही संभ्रमात पडतात. माझ्याही बाजूचे कार्यकर्ते संभ्रमात पडतात आणि तिथे काही नेतेही संभ्रमात पडतात. मात्र राजकीय भूमिका वेळी असते आणि परिवारातली भूमिका ही वेगळी गोष्ट असते. त्याची काही जोड लावून कार्यकर्ता गाफील राहू नये असं मला वाटतं," असं म्हणत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 


विधानसभेचा विचार आताच नको


आता येणारी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे आताच विधानसभेचा विचार करु नका, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना बजावलं आहे. बोलताना आणि चर्चा करताना महायुतीमधील मित्रपक्ष नाराज होणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचा दावा केला आहे. आपला गट हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं आहे.