Nationalist Congress Party Ajit Pawar Faction : एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काहीसा पिछाडीवर पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर म्हणजेच  अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादीने दणक्यात  एन्ट्री केली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेतील यशानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी दावा करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचे 3 आमदार विजयी झाले आहेत. अजित पवार पक्षाचे  टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन या तीन उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार आहेत.  लवकरच अजित पवार निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी दावा करणार आहेत.  मागच्या वर्षी NCP चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता. मात्र, आता अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा मान्यतेसाठी दावा करणार  असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 


अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता.  2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली.  राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, पक्ष आणि चिन्ह असं म्हणत अजिच पवार पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता.  यानंतर निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे. 


वर्षभरापूर्वी रद्द झाली होती राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्षाची मान्यता


राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागतात. या निकषांची पूर्तता न केल्यामुळे निवडणुक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केल्याचे समजते. 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. राष्ट्रवादीला 2014 नंतरच्या कामगिरीमुळे तो धोक्यात आला होता.  2019 नंतर 21 पैकी 12 राज्यात राष्ट्रवादीने निवडणुक लढवली होती. या निकालातील राष्ट्रावादीची कमजोरी विचारात घेऊन एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रावदीची मान्यता रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले होते. 


काय आहेत निवडणुक आयोगाचे निकष


विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत
लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत.
लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत
या जागा कमीत कमी 3 राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत
संबधीत पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. (पश्चिम बंगाल,त्रिपुरा,मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे तृणमूल काँग्रेसला नुकताच 7 व्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला गेला आहे.)


राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे 


राखीव निवडणूक चिन्ह
सरकारतर्फे पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन
दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण
निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण