अजित पवारांना टक्कर देणार त्यांच्याच धाकट्या भावाचे सुपूत्र; बारामतीच्या राजकारणात पुन्हा काका पुतण्याची लढाई
Maharashtra Politics : युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच तसे संकेत दिलेत. युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत काका विरुध्द पुतण्या लढाईचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो.
Yugendra Pawar On Ajit Pawar : बारामती आणि पवार हे गेल्या अनेक दशकांपासूनचं समीकरण. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवारांच्या बंडानंतर आता परिस्थिती बदललीय.... पहिल्यांदाच बारामती लोकसभेत पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. याच लढतीचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ज्या अजित पवारांनी आपले काका शरद पवारांविरोधात बंड केलं.....त्याच अजित पवारांना त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार कट्टर फाईट देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं बारामतीच्या राजकारणात काका विरुद्ध पुतण्या अशी नवी लढाई रंगणाराय.. विधानसभेला बारामतीमधून युगेंद्र पवार राजकीय आखाड्यात उतरू शकतात, असे संकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिलेत.
गेल्या विधानसभेला कर्जत जामखेडमधून रोहित पवारांना मैदानात उतरवण्यात आलं. यावेळी युगेंद्र पवारांसारख्या नव्या नेतृत्वाला संधी देणं योग्यच असल्याचं मत आमदार रोहित पवारांनीही व्यक्त केलंय. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीची दोन शकलं झाली. त्यानंतर युगेंद्र पवारांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आक्रमक झालेले युगेंद्र पवार बारामतीमधल्या राजकीय व्यासपीठांवर दिसू लागले.
युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या अगदी जवळचे मानले जातात. त्यांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत अजितदादा विरुद्ध युगेंद्रदादा अशी लढत अटळ आहे. महाराष्ट्रातला काका विरुद्ध पुतण्या लढाईचा हा दुसरा अंक आधीच्या अंकाएवढाच रंगतदार आणि उत्कंठावर्धक ठरण्याची शक्यता आहे...
कोण आहेत युगेंद्र पवार?
- 33 वर्षांचे युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत
- कौटुंबिक शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या युगेंद्र यांनी बारामती शहरात समर्थकांचं जाळं निर्माण केलं
- शरद पवारांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे ते विश्वस्त आणि खजिनदार आहेत
- तसंच बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे प्रमुखही आहेत
- फलटणस्थित शरयू ऍग्रो इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत
- शरयू साखर कारखाना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे