जयेश जागड, झी मीडिया, अकोला : अकोला (Akola News) जिल्ह्यातील बाळापूर (Balapur) तालुक्यातील पारसगाव येथे रविवारी भीषण अपघात झालाय. या अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. बाबूजी महाराज संस्थेच्या (Babuji Maharaj) आवारातील झाडावर वीज कोसळल्याने ते झाडाला लागून असलेला टिन शेड कोसळला आणि या दुर्देवी घटनेत 7 भाविकांचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी धाव घेत तात्काळ मदतकार्यास सुरुवात केली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारसगावात बाबूजी महाराज संस्थानाचं मंदिर आहे. रविवार असल्याने संध्याकाळी आरतीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. आरतीनंतर अचानक सुरु झालेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात वारे वाहू लागले आणि वीज चमकू लागली. त्यातील वीज जुन्या कडुलिंबाच्या झाडावर कोसळली. वीज कोसळताच झाड टिनाच्या मोठ्या शेडवर पडली. त्यामुळे शेड कोसळ्याने त्याखाली असलेले भाविक दबले गेले. या अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला.


प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम


"आरती घेतल्यानंतर आम्ही खाली बसलो होतो. तेव्हा अचानक एकाएकी वादळ आले. भयानक वादळात वीज चमकली आणि झाड शेडवर पडले. तिथे जवळपास 200 लोक होते. झाड पडताच टिनाचे शेड आमच्या अंगावर पडले. अनेक जण जखमी झाले तर काही मरण पावले. आम्हालाही जखमा झाल्या आहेत," असे प्रत्यक्षदर्शी सुनीता कवडे यांनी सांगितले. सुनीता कवडे यादेखील अपघातात जखमी झाल्या आहेत.


"पारसगाव येथे रविवारी संध्याकाळी 7.30 ते 7.45 दरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातात 150 वर्षे जुने झाड टिन शेडवर कोसळलं आहे. जवळपास 30 ते 40 लोक या अपघातात जखमी झाले आहेत. त्यातील सात भाविकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर एका भाविकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या घटनेचे मुख्य कारण मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने झाड मुळासकट उघडले गेले. प्रशासनाकडून मृतांना भरपाई दिली जाणार आहे. सर्वांवर उपचार सुरु आहेत. तर चार जणांचा जागीच मृत्यू  झाला आहे," अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.


"बाळापूर तालुक्यातील पारसगाव दुर्दैवी घटना घडली आहे. बाबुजी महाराज संस्थानमध्ये रविवारी संध्याकाळी भक्त दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मंदिराच्या समोर असणाऱ्या सभामंडपामध्ये टिनशेड खाली भाविक बसले होते आणि अचानक वादळ सुरु झाले. त्यानंतर काही भाविकांनी मंदिरामध्ये निवारा घेतला. तर टिनशेड खाली असलेले भाविक लिंबाचे फार जुने झाड पडल्यामुळे त्याखाली दबली," अशी माहिती अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.