जयेश जागड, झी मीडिया, अकोला : अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील बेपत्ता असलेल्या सात वर्षीय शेख अफ्फान या चिमुकल्याच्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केलाय. खेळायला गेलेल्या अफ्फानचा शोध 12 दिवस सुरू होता. मृतदेह मिळाल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी 16 व्या दिवशी मारेकरीचा शोध लावलाय. धक्कादायक बाब म्हणजे मारेकरी दुसरा कुणी नसून अफ्फानचा 16 वर्षीयचा चुलत भाऊ आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांच्या तपासात हा खुनाचा प्रकार असल्याचे उघड झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला जिल्ह्यातील पिंजर गावातून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय अफ्फान या चिमुकल्याचा मृतदेह 11 दिवसांनंतर विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पिंजर येथील शेख अफ्फान आयुब बागवान हा 19 डिसेंबर रोजी बेपत्ता झाला होता. पिंजर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला होता. मात्र तरीही त्याचा शोध लागत नव्हता. 30 डिसेंबर रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पिंजरमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर श्वान पथकाच्या मदतीने एका विहिरीत शेख अफ्फानचा मृतदेह सापडला.


अफ्फानचा मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा गळा आवळून खून केल्याचे अहवालातून स्पष्ट झालं. शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकिस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु केला. या गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांनी अफ्फानच्या 16 वर्षीय अल्पवयीन चुलत भावाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्यानेच अफ्फानची हत्या केल्याची कबुली दिली.


अफ्फानची हत्या का केली?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी मृत शेख अफ्फान आणि त्याचा चुलत भाऊ हे दोघेही एका शेतातील विहिरीच्या बाजूला असलेल्या बंद खोलीतील कबुतर पकडण्यास गेले होते. खोली बंद असल्याने दोघेही खिडकीतू आत शिरले. मृत शेख अफ्फान हा खिडकी जवळ पोते घेऊन थांबला होता. चुलत भावाने अफ्फनला खोलीच्या खिडकीजवळ पोते पकडून बसवले होते. त्यानंतर चुलत भावाने खोलीमधून कबुतर हाकलले. मात्र अफ्फानने जाणूनबुजून कबुतर सोडून दिले असा समज आरोपी भावाला झाला. रागाच्या भरात त्याने अफ्फानचा गळा आवळून त्याला विहिरीत धक्का दिला. त्यामुळे विहिरीत पडून अफ्फानचा मृत्यु झाल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी आरोपी चुलत भावाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.