Akola News : राज्यात नायलॉन मांजाच्या ( Nylon Thread Ban) वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. नायलॉन मांजाच्या (Nylon Thread) वापरामुळे पक्षांबरोबरच माणसांच्या जीवालाही धोका आहे. नायलॉन मांजा अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण आजही याचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे कठोर कारवाई केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अकोल्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नायलॉन मांज्याने चिमुकल्याचा गळा चिरला
अकोला शहरातील आश्रय नगर इथं राहणारा साडेतीन वर्षांचा वीर उजाडे आपल्या आईसोबत स्कूटीवरुन चालला होता. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारत अचानक त्यांच्या स्कूटीसमोरून कटलेली पतंग गेली. या पतंगीचा मांजा वीरच्या गळ्यात अडकला आणि त्या मांजामुळे चिमुकल्या वीरचा गळा जवळपास चार इंचापर्यंत चिरला गेला. गळ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रस्कस्त्राव झाला. 


घाबरलेल्या वीरच्या आईने गंभीर स्थितीतच त्याला खासगी रुग्णालयात भरती केलं.  शस्त्रक्रिया करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च सांगण्यात आला, परंतु एक लाख रुपये या कुटुंबासाठी मोठी रक्कम होती. ही बाब वीरचे वडील प्रकाश उजाडे यांच्या मोठ्या भावाच्या माध्यमातून अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना कळली आणि या मंडळींनी क्षणाचाही विलंब न लावता, पैसे गोळा करून चिमुकल्या वीरवर उपचार व शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला.


वीरच्या गळ्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेमुळे वीरचे प्राण बचावले. शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा विक्री होत असल्याने, लहान मुलांसह नागरिकांचे जखमी होण्याच्या घटनाही वाढत आहेत.


कठोर कारवाईच गरज
नायलॉन मांजाच्या निर्मितीसह विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचे आदेश दरवर्षी काढले जातात. पण नायलॉन मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू असल्याचे चित्र शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही दिसत आहे. मकर संक्रांतीचा सण जवळ येऊ लागला की आकाशात विविधरंगी पतंगांची गर्दी होऊ लागते.  पतंग उडविण्यासाठी कोणताही दोरा पुरेसा असला पंतंगांचा काटाकाटीचा खेळ लावण्यासाठी 
नायलॉनचा मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 


या धारदार मांजामुळे पक्षीच नाही तरर नागरिकांनाही गंभीर इजा झाल्याचे कितीतरी प्रकार घडले आहेत. त्यामुळेच या मांजाच्या निमिर्तीसह विक्री आणि वापरावर दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जाते. पण आता कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.