जयेश जगड / अकोला : रस्ता रुंदीकरणात वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत. अकोला ते महान रस्तारुंदीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडच्या विरोधक अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने वृक्ष बचाओसाठी "चिपको आंदोलन" करण्यात आलं. या मार्गावर आहेत सुमारे ९०० निंबाची जुनी झाडे आहेत. दरम्यान, विरोध केल्यानंतर हे काम थांबविण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला-मंगरूळपीर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी मार्गावरील हजाराच्यावर झाडांची कत्तल सुरु आहे. वृक्षतोड करण्यात येत असलेसी सर्व झाडे ५० ते १०० वर्षांपूर्वीची आहेत. आतापर्यंत यातील जवळपास ४५० झाडे कापण्यात आली आहेत. आज वृक्षांच्या या कत्तलीविरोधात वंचित बहुजन आघाडीने कान्हेरी सरप गावाजवळ चिपको आंदोलन सुरू केले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी यावेळी झाडांना मिठ्ठी मारत वृक्ष तोडण्याविरोधात घोषणाबाजी केली. 


 हा मार्ग केवळ सहा फुटाने विस्तारित करण्यात येणार आहे. रस्ते विकास महामंडळाने रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी पर्यावरणाचे सर्व नियम आणि कायदे पायदळी तुडविल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. आज सकाळीपासून वंचितचे दोनशेवर कार्यकर्ते या मार्गावर आंदोलनसाठी उपस्थित होते.


दरम्यान, या आंदोलनानंतर रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलनामुळे पुढील आदेशापर्यंत या मार्गावरील वृक्षतोड सध्या थांबविण्यात आली आहे. विकासात्मक काम करतांना निसर्गाची काळजी घेत जर काम झाली तर अश्याप्रकारे आंदोलनाची वेळ येणार नाही हे मात्र निश्चित, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.