नितेश महाजन, झी मीडिया, जालना : नातेवाईक असल्याचं सांगून आठवीत शिकणाऱ्या मुलीचं शाळेतून अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना जालन्यात उघड झाली आहे. जालना शहरातील एका इंग्रजी शाळेतील हा प्रकार असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
मी मुलीचा नातेवाईक आहे, मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला दवाखान्यात न्यायचं आहे असं सांगून अजय गायकवाड या तरुणाने 14 वर्षीय विद्यार्थिनीला शाळेतून बाहेर नेलं. उशीरापर्यंत मुलगी शाळेतून घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी मुलीची शोधाशोध सुरु केली. मुलगी सापडत नसल्याने कुटुंबियांनी याची पोलीस स्थानकात तक्रार केली.


पोलिसांनी तातडीने पावलं उचलत मुलीचा शोध घेतला. त्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता मुलीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचं चौकशीत समोर आलं. आरोपी अजय गायकवाडविरोधात पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 


दरम्यान, एक अज्ञात व्यक्ती शाळेत येऊन कारण सांगते आणि कोणतीही शहानिशा न करता शाळा या मुलीला त्याच्याबरोबर पाठवतात याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.