अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  शेंगदाण्याला आपण गरीबांचा बदाम म्हणतो. मात्र याच शेंगदाण्याला पिस्ता बनवून काही भेसळखोरांनी लुटीचा गोरखधंदा सुरू केला आहे. शेंगदाण्याला कृत्रिम रंग देऊन पिस्ता म्हणून त्याची राजरोजपणे विक्री सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात FDAनं मोठी कारवाई करत तब्बल 621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केलाय. विशेष म्हणजे या शेंगदाण्याची नागपुरातल्या मिठाईवाल्यांना विक्री केली जाणार होती. FDAचं पथक नागपूरच्या बाबा रामसुमेर नगर परिसरात पोहचले तेव्हा भेसळखोर सडक्या शेंगदाण्याला हिरवा रंग देऊन पिस्ता बनवत असल्याचं उघड झालं. 


पिस्त्याच्या नावाखाली सडका शेंगदाणा 
सडक्या शेंगदाण्याला हिरव्या आणि लाल रंगात रंगवून ते उन्हात वाळवले जायचं. चाळणीतून चाळून पिस्ता किंवा बदामासारखं बनवलं जायचं. नंतर मशीनने त्याचे छोटे तुकडे केले जायचे. पुढे 90 रूपये किलो शेंगदाण्याची 1500 ते 1700 रूपये दरानं मिठाई व्यापाऱ्यांना विक्री केली जात होती. 


सोनपापडी, पेढे, बर्फी, लाडू यासारख्या मिठायांवर चवीसाठी पिस्ता किंवा बदामाचे चिप्स लावलेत जातात. मात्र सुकामेवा महाग असल्यानं भामट्यांनी हीच संधी साधत पैसे कमावण्याठी भेसळीचा धंदा सुरू केला. हा सडका शेंगदाणा आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 


शेंगदाणा रंगवण्यासाठी कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. हे कृत्रिम रंग आरोग्यासाठी प्रचंड हानीकारक आहेत. हे रंग पोटात गेल्यास कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. 


त्यामुळे बाजारातून मिठाई तसच सुकामेवा घेतांना सजग राहा. कुठं भेसळखोरी सुरू असेल तर यंत्रणांना तात्काळ याची माहिती द्या. कारण सवाल तुमच्या आमच्या आरोग्याचा आहे.