मुंबई : शनिवारी सकाळी मुंबईच्या गेटवे येथून मांडव्याच्या दिशाने निघालेल्या एका प्रवासी बोटीला अपघात झाला. मांडवा जेट्टीजवळ पोहोचत असतानाच एका खडकावर आदळल्यामुळे अजंठा बोट हळूहळू पाण्यात बुडू लागली. बोटीला झालेला हा अपघात पाहून त्यातून प्रवास करणाऱ्या जवळपास ८०हून अधिक प्रवाशांनी मृत्यू जवळून पाहिला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं होणार असं वाटत असतानाच अखेर काही देवदूतांनी या प्रवाशांना मदतीचा हात दिला आणि मोठा अनर्थ टळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांडव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या या प्रवाशांचे प्राण वाचले ते म्हणजे सागरी पोलीस यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या काहीजणांमुळे. याचविषयी घटनास्थळी असणाऱ्या प्रशांत घरत या बचाव पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गस्तीसाठीची त्यांची सदगुरु कृपा ही बोट निघालेली असतानाच या अपघाताची माहिती त्यांना मिळाली. 


''गस्तीसाठी आमची 'सदगुरु कृपा' ही बोट निघाली असतानाच मुंबईहून येणाऱी अजंठा ही बोट अचानकपणे आम्हाला अर्ध्यातच थांबलेली दिसली. तेव्हा त्या बोटीत काही प्रवासी वाचवा वाचवा असा आवाज देत होते. हे आम्ही पाहिलं आणि लगेचच पोलिसांची बोट ही अजंठाजवळ नेण्यात आली'', असं घरत म्हणाले. 


पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे अपघाताच्या कठीण प्रसंगातही मोठा अनर्थ टळला. पोलिसांच्या माहितीनुसार बोटीत असणाऱ्या ८८ प्रवाशांपैकी ८० प्रवासी हे 'सदगुरु कृपा' या बोटीवर घेण्यात आले आणि त्यांना मांडवा जेट्टी येथे आणण्यात आलं. तर, उर्वरित आठ प्रवाशांना स्पीड बोटमध्ये घेण्यात आलं. अशा प्रकारे सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं.



वाचा : 'माझ्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू, मृतदेह घरातच पडलाय'  


मुंबई- मांडवा असा सागरी प्रवास अनेकांसाठी तसा सवयीचा. पण, असा एखादा प्रसंग ओढावला जाण्याच्या भीतीमुळे प्रवासीही काही प्रमाणात धास्तावले आहेत. असं असलं तरीही या वातावरणात प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांवर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. हेच खरे देवदूत, असं म्हणत अनेकांनीच या वर्दीतील असामान्य व्यक्तींच्या प्रयत्त्नांची दाद दिली आहे.