मुंबई : भारत हा एक असा देश आहे जिथं विविधतेत एकता किंवा बंधुभावाची सुरेख उदाहरणं अनेकदा पाहायला मिळाली आहेत. धर्माच्या नावाखाली अनेकदा याच आदर्श उदाहरणांना आणि संस्कृतीला छेद देण्याचाही प्रयत्न केला गेला. पण, एकात्मता आणि बंधुभावाचं हे नातं इतकं दृढ की त्यावर या साऱ्याचा तसा थेट परिणामच झाला नाही. याचीच प्रचिची महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याची बरीच चर्चा सुरु आहे, जेथे धर्माच्या सीमा ओलांडत एका सुरेख आणि तितक्याच नि:स्वार्थ नात्याची प्रचिती सर्वांनाच आली आहे. 


आदर्श नातं म्हणतात ते हेच याचीच अनुभूती या निमित्तानं सर्वांना येत आहे. महाराष्ट्रातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी 'बाबा भाई पठाण' यांच्या हस्ते पार पडले. 


लग्नबंधनात अडकलेल्या या दोन्ही मुलींची आई दरवर्षी "बाबा भाई" यांना राखी बांधते. कारण त्यांना सख्खा भाऊ नाही. त्यामुळं या लग्नात भावाची आणि मामाची भूमिका "बाबा भाई" पठाण यांनी बजावली.



 


सामाजिक ऐक्याचा एक डोंगरा एवढा आदर्शच त्यांनी आपल्या या कृतीतून समाजापुढं उभा केला. इतकंच नव्हे तर, विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिली. सोशल मीडियावर या विवाहसोहळ्यातील फोटो पाहताना अनेकांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या. शिवाय या नात्याला आपोआपच सर्वांनी सलामही केला.