Manoj Jarange Patil On OBC Leaders: ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकत आहेत, असा आरोप मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरुन जरांगेंनी टीका केली आहे. जरांगेंनी छगन भुजबळ यांनाही टोला लगावला आहे. भुजबळांचं आयुष्य हे आरक्षण हिसकावण्यात गेल्याची टीकाही जरांगेंनी केली आहे.


मराठा नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओबीसींकडून मराठा आरक्षणाला विरोध होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत जरांगे-पाटलांनी, "त्यांना आरक्षण असून ते इतके विरोधात लढत आहेत. आम्हाला आरक्षण नाही तर आम्ही किती लढू याचा विचार संपूर्ण राज्याने केला पाहिजे," असं म्हटलं आहे. "इथून पुढचे खानदानी मराठे सगळे मतदभेद सोडून एकत्र येणार आहेत. ते इतका त्रागा करायला लागलेत. मराठ्यांविरोधात विष ओकू लागले आहेत. त्यामुळे आता मराठे मतभेद विसरुन त्यांच्या लेकरांसाठी लढणार आहेत. मराठ्यांच्या नेत्यांनी हे पहायला हवं. आरक्षण असून ते इतके लढायला लागले आहेत किंवा त्यांना फूस लावून लढायला लावत आहे. मग मराठा नेते काय डोळे उघडे ठेऊन नुसतं बघत आहेत का? की झोपलेले आहेत?" असा प्रश्न जरांगे-पाटलांनी विचारला आहे.


मराठे एकत्र येतील


"मराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील मराठे एकत्र येतील. आम्हाला आरक्षणच नाही. तुम्हाला आरक्षण असून तुम्ही आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून एवढं लढत आहात तर मिळावं म्हणून आम्ही चौपट लढू," असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे. "कोणत्या पक्षाचा नेता असो जे मदत करणार नाही त्यांना उघडं पाडल्याशिवाय मराठा राहणार नाही," असा इशारा जरांगे पाटलांनी सर्व राजकारण्यांना दिला आहे.


भुजबळांबद्दल काय म्हणाले जरांगे-पाटील?


भुजबळांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता मनोज जरांगे पाटलांनी, "भुजबलांचं उभं आयुष्य गोरगरीबांच्या लेकरांचं आरक्षण हिसकावून घेण्यात आणि पाप करण्यात गेलं. त्यामुळे आता कोणाला काय सांगायची गरज आहे का? ते विरोधातच आहेत. उभं आयुष्यात त्यांनी त्यातच घातलं आहे. लोकांच्या लेकरांचे मुडदे कसे पडतात. मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. मराठ्यांच्या लेकरांच्या नरड्याला नख लावायचं काम त्यांनी उभं आयुष्यभर केलेलं आहे. ते आमच्याकडून बोलतील अशी अपेक्षाच मला नाही," असं उत्तर दिलं.