दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात ही काँग्रेसचा सुपडा साफ झाला. राज्यात काँग्रेसचा केवळ एकच खासदार निवडून आला. राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी आधीच आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यात आता नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नांदेडमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. राजीनामे स्वीकारून नव्या नियुक्त्या कराव्यात अशी राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांना विनंती केली आहे. टिळक भवन येथे विधानसभा आढावा बैठकीतच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ च्या मोदी लाटेत देखील अशोक चव्हाण हे लोकसभेवर निवडून गेले होते. परंतु त्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. राज्यातून काँग्रेसचा केवळ
१ खासदार निवडून आला. यूपीएच्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केवळ ९१ खासदार निवडून आले.


लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधी यांनी देखील अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा न देण्याचा आग्रह केला आहे. दुसरीकडे इतर पक्षाच्या नेत्यांनीही जय-पराजय सुरु असतो म्हणत राहुल गांधींना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला आहे.


देशभरात काँग्रेस आमदार आणि नेते निराश झाल्यामुळे भाजपच्या वाटेवर आहेत. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा उभारी मिळण्यासाठी काम करावं लागणार आहे.