COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे : कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचं धुमशान सुरु झालं आहे. ही जागा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. विधानपरीषदेच्‍या कोकण पदवीधर मतदार संघातील एका जागेसाठी 25 जून रोजी मतदान होतं आहे. तब्‍बल 17 उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे संजय मोरे, भाजपचे निरंजन डावखरे आणि राष्‍ट्रवादीचे नजीब मुल्‍ला यांच्‍यातच आहे. महत्‍वाचे म्‍हणजे हे तीनही उमेदवार ठाण्‍यातले आहेत. कोकणात सेनेची ताकद असली तरी युतीच्‍या वाटपात ही जागा भाजपकडे राहिली. यावेळी शिवसेना पहिल्‍यांदाच या निवडणूकीच्‍या रिंगणात उतरली आहे.


शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे हे ठाण्‍याचे महापौर राहिले आहेत. आदित्‍य ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्‍ठेची केली आहे. त्‍यांनी नुकताच कोकणचा दौराही केला. केंद्रीय मंत्री अनंत गीते हे सध्‍या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. या मतदार संघात 5 जिल्‍हयांचा समावेश असून एकूण 1 लाख 3 हजार 68 मतदारांपैकी सर्वाधिक 46 हजार 757 मतदार ठाणे जिल्‍हयात आहेत. राष्‍ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्‍ला यांच्‍या प्रचाराची जबाबदारी राष्‍ट्रीय सरचिटणीस आमदार सुनील तटकरे यांनी सांभाळली आहे. मुल्‍ला यांना शेकाप, काँग्रेस, समाजवादी पार्टी यांचा पाठिबा मिळाला आहे. सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे नुकतेच कोकण स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था मतदार संघातून विजयी झालेत तयामुळे मुल्‍ला यांना निवडून आणण्‍याचे आव्‍हान त्‍यांच्‍यासमोर आहे.


या निवडणूकीपूर्वी काही दिवस आधी निरंजन डावखरे यांनी आमदारकी व पक्षाचा राजीनामा देत भाजपाकडून उमेदवारी मिळवली. नारायण राणेंनी डावखरेंना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसमधील नाराज मतदारांवरही त्‍यांचा डोळा आहे. तीनही प्रमुख पक्षांनी विजयाचे दावे करत प्रचाराची राळ उडवून दिली आहे. घोडामैदान जवळ आहे. कोकणातील सुशिक्षित मतदार कुणाच्‍या बाजूनं कौल देतोय हे लवकरच स्‍पष्‍ट होईल .